गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:23 IST

साखर स्वस्त होणार? सरकारकडून अडीच लाख टन रिफाईंड साखर बाजारात आणण्याचा निर्णय

पेट्रोल-डिझेल, भाजीपाला यांच्या दरवाढीनंतर आता साखरही महागल्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने सणासुदीच्या तोंडावर बाजारात मोठ्या प्रमाणात रिफाईंड साखर आणण्याचा निर्णय घेतलाय.

साखर स्वस्त होणार? सरकारकडून अडीच लाख टन रिफाईंड साखर बाजारात आणण्याचा निर्णय छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा भार अजूनही कमी झालेला नाही. त्यात भाजीपाल्याचे भाव सतत वाढत असल्याने सामान्य माणसाच्या खिशाला आधीच कात्री लागलीय. आणि आता या यादीत आणखी एका जिन्नसाची भर पडलीय, चहापासून मिठाईपर्यंत रोजच्या वापरातली साखरही महागलीय. सणासुदीच्या तोंडावर हे दर आणखी वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारने एक मोठं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातंय.

साखरेचे भाव आटोक्यात ठेवण्यासाठी सरकारने साखर कंपन्यांना देशातल्या बाजारात तब्बल अडीच लाख टन रिफाईंड साखर उपलब्ध करून देण्याची घोषणा केलीय. सणासुदीच्या दिवसांत साखरेची मागणी वाढते, अशावेळी बाजारातला पुरवठा वाढवावा हाच या मागचा मुख्य हेतू आहे.

रेणुका शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील कुमार यांनी याबद्दल माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, देशांतर्गत बाजारात जवळपास अडीच लाख टन ALS रिफाईंड साखर विकण्याची ऑफर दिली गेलीय.

भारतात रेणुका शुगर्ससह आणखी एक अशा दोन स्वतंत्र साखर रिफायनरीज आहेत. निर्यातीसाठी ॲडव्हान्स लायसन्सिंग स्कीम म्हणजेच ALS अंतर्गत या रिफायनरीज कच्ची साखर आयात करतात. पण गेल्या महिन्यात सरकारने या रिफायनर्सना ALS अंतर्गत तयार झालेली रिफाईंड साखर देशातल्या बाजारातच विकायला सांगितलं होतं.

सरकारच्या या पावलांमुळे साखरेच्या किमतीत काही प्रमाणात घट झाल्याचं म्हटलं जातंय. आता ही अतिरिक्त रिफाईंड साखर बाजारात आल्यावर दरावरचा दबाव आणखी वाढून सामान्य ग्राहकाला थोडा दिलासा मिळू शकतो.

या रिफाईंड साखरेची किंमत साधारण 43 ते 44 रुपये प्रति किलो इतकी असल्याचं सांगितलं जातंय. विशेष म्हणजे आयात केलेल्या साखरेचा खर्च अंदाजे 50 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे बाजारात येणारी ही देशांतर्गत रिफाईंड साखर तुलनेने स्वस्त पडणार आहे.

साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने याआधीही काही पावलं उचलली होती. त्यात दहा लाख टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी, मोठे वापरकर्ते आणि डीलर्ससाठी स्टॉकहोल्डिंग मर्यादा कडक करणं आणि साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घालणं, या गोष्टींचा समावेश होता.

रिफाईंड साखर आणि कारखान्यात तयार होणारी मिल साखर यांच्यात प्रक्रिया आणि शुद्धतेच्या बाबतीत फरक असतो. मिल साखर उसाच्या रसावर प्रक्रिया करून बनवली जाते, त्यामुळे तिच्यात काही नैसर्गिक घटक आणि थोडी अशुद्धता राहू शकते. रिफाईंड साखर मात्र मिल साखरेला पुन्हा वितळवून, फिल्टर करून आणि अतिरिक्त अशुद्धता काढून तयार केली जाते. त्यामुळे ती जास्त शुद्ध आणि चकचकीत पांढऱ्या रंगाची दिसते. मिल साखरेचा ICUMSA दर्जा साधारण 150 ते 400 च्या दरम्यान असतो, तर रिफाईंड साखरेचा हा स्तर 45 पेक्षा कमी असतो.

घरगुती वापरासाठी बहुतेकवेळा मिल साखर वापरली जाते. तर रिफाईंड साखरेचा वापर मोठ्या प्रमाणावर बेकरी उद्योग, शीतपेय बनवणाऱ्या कंपन्या आणि औषधनिर्मिती क्षेत्रात होतो. सणासुदीच्या दिवसांत मिठाई, बेकरीचे पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढते, त्यामुळे साखरेचीही गरज वाढते. अशा वेळी बाजारात अतिरिक्त अडीच लाख टन रिफाईंड साखर आल्यास पुरवठा वाढून दर आटोक्यात राहायला मदत होऊ शकते.

तरीही या निर्णयाचा किरकोळ बाजारातल्या साखरेच्या दरावर नेमका किती परिणाम होतो आणि ग्राहकांना प्रत्यक्षात किती फायदा होतो, हे पुढच्या काळात स्पष्ट होईल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ