Kinetic DX+ 3.1kWh १.२७ लाख रुपयांना लाँच, देणार १३२ किमी रेंज! पाहा फीचर्स
इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये कायनेटिकने आपल्या DX+ स्कूटरचं अपग्रेड केलेलं 3.1 kWh व्हर्जन आणलंय, जास्त रेंज आणि नव्या फीचर्ससह.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
इलेक्ट्रिक स्कूटरच्या मार्केटमध्ये ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्या सतत जास्त रेंज आणि नवीन फीचर्स असलेली मॉडेल्स आणत असतात. रोज नव्या स्कूटर लाँच होत असल्यामुळे ग्राहकांना जास्त पर्याय मिळतायत आणि कंपन्यांमध्येही स्पर्धा वाढतेय. याच स्पर्धेत आता कायनेटिकने आपल्या लोकप्रिय DX+ स्कूटरचं अपग्रेड केलेलं 3.1 kWh व्हर्जन बाजारात उतरवलंय. या नव्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत Rs. 1,27,650 आहे. याच्या तुलनेत रेग्युलर DX 3 kWh स्कूटरची किंमत Rs. 1,18,599 इतकी आहे. म्हणजे दोन्ही स्कूटरमध्ये साधारण Rs. 9,000 चा फरक आहे.
नव्या कायनेटिक DX+ 3.1 kWh मध्ये आधीपेक्षा मोठी LFP बॅटरी बसवण्यात आलीय. कंपनीच्या म्हणण्यानुसार या बॅटरीमुळे IDC प्रमाणित रेंज 132 किमीपर्यंत मिळते. पण खऱ्या वापरात, म्हणजे रोजच्या रस्त्यावर चालवताना, ही स्कूटर एका चार्जमध्ये साधारण 105 ते 110 किमीपर्यंत पळू शकते. IDC रेंज आणि प्रत्यक्ष रस्त्यावरची रेंज यात नेहमीच काही फरक असतो, तसाच फरक इथेही दिसतो. त्यामुळे रोजचा शाळा-कॉलेज, ऑफिस किंवा बाजाराचा फेरा मारण्यासाठी ही रेंज पुरेशी ठरू शकते.
पॉवरसाठी या स्कूटरला हब-माउंटेड BLDC मोटर देण्यात आलीय, जी जास्तीत जास्त 3.8 kW पॉवर देते. रायडिंगसाठी दोन मोड ठेवलेत, Range आणि Power, म्हणजे रायडरला गरजेनुसार जास्त रेंज किंवा जास्त पॉवर निवडता येते. शिवाय K-Coast Tech नावाचं फीचर आहे, ज्यामुळे स्कूटरचा वेग कमी करताना ऊर्जा परत मिळवली जाते. बॅटरी 0 ते 80% चार्ज व्हायला साधारण 3 तास लागतात. एक खास गोष्ट म्हणजे यात रिट्रॅक्टेबल चार्जिंग केबल स्टँडर्ड म्हणून दिलेली आहे, ती वेगळी विकत घ्यावी लागत नाही.
फीचर्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर DX+ मध्ये Reverse Assist आहे, सोबत Park Assist, टेलिमॅटिक्स आणि IP67 वॉटर-डस्ट प्रोटेक्शनही देण्यात आलंय. अंडरसीट स्टोरेज तब्बल 37 लिटर इतकं आहे, त्यामुळे रोजचं सामान ठेवायला पुरेशी जागा मिळते. दोन्ही बाजूला 12-इंच ट्युबलेस टायर्स असून ग्राउंड क्लीयरन्स 165 mm ठेवण्यात आलंय. ब्रेकिंगसाठी पुढच्या बाजूला 220 mm डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला 130 mm ड्रम ब्रेक दिलाय.
कायनेटिक DX+ 3.1 kWh Black, Silver, Blue, White आणि Red अशा रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलंय, त्यामुळे ग्राहकांना निवडीला वाव मिळतो. कंपनीने या मॉडेलसोबत फेस्टिव्ह सीझनसाठी काही खास ऑफर्सही जाहीर केल्यात. DX+ खरेदी केल्यावर Rs. 3,000 चा थेट फायदा मिळतोच, शिवाय Rs. 8,999 किमतीची एक्स्टेंडेड वॉरंटी, Rs. 5,000 चा Amazon कॅशबॅक आणि Rs. 5,000 चा PM E-Drive लाभही सोबत मिळतो.