Jio च्या 399 आणि 349 रुपये प्लानवर वर्षभर मोफत Canva Pro सबस्क्रिप्शन
रिलायन्स जिओने कॅनव्हासोबत भागीदारी करत ग्राहकांना रिचार्जवर मोफत डिझायनिंग सबस्क्रिप्शन देण्याची ऑफर आणली आहे.
मोबाईल रिचार्ज करताना आता जिओ युजर्सना एक जास्तीचा फायदा मिळणार आहे. रिलायन्स जिओने डिझायनिंगसाठी लोकप्रिय असलेल्या कॅनव्हा या कंपनीशी भागीदारी केली असून, यामुळे ठराविक प्लानवर रिचार्ज करणाऱ्या युजर्सना 12 महिन्यांसाठी कॅनव्हा प्रो किंवा कॅनव्हा प्रोलाईटचे सबस्क्रिप्शन कोणत्याही जास्तीच्या पैशाशिवाय मिळणार आहे. बाजारात हे एका वर्षाचे सबस्क्रिप्शन साधारण 4,000 रुपयांना मिळते. 16 सप्टेंबर 2026 पासून ही ऑफर युजर्ससाठी सुरु झाली आहे.
ही मोफत सुविधा कोणत्या दर्जाची मिळणार, हे युजर्सने कोणता प्लान निवडला यावर अवलंबून आहे. जो युजर 399 रुपयांच्या प्रीपेड प्लानने रिचार्ज करतो, त्याला पूर्ण वर्षभरासाठी कॅनव्हा प्रो मोफत दिला जाईल. तर 349 रुपयांचा किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचा प्लान घेणाऱ्या युजर्सला कॅनव्हा प्रोलाईटचा फ्री अॅक्सेस मिळेल.
399 रुपयांच्या प्लानमध्ये कोणतेही जादा शुल्क न भरता वर्षभर कॅनव्हा प्रो वापरता येईल, म्हणजे वेगळे सबस्क्रिप्शन विकत घेण्याची गरज उरणार नाही. कॅनव्हाच्या स्वतःच्या वेबसाईटवर या प्रो प्लानची किंमत सध्या दरवर्षी 4,000 रुपये इतकी आहे, त्यामुळे आधीपासून कॅनव्हा वापरणाऱ्या युजर्ससाठी ही ऑफर फायद्याची ठरू शकते. मात्र यासाठी MyJio अॅपमधील संबंधित ऑफरवरूनच क्लेम करावा लागेल.
349 रुपयांचा प्लान घेतला तरी युजर्सला वर्षभरासाठी कॅनव्हा प्रोलाईटचे सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय 349 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या आणि दररोज 2GB डेटा देणाऱ्या काही पात्र प्लानवरही प्रोलाईटची ऑफर लागू होते. म्हणजेच जिओने ही सवलत फक्त एकाच रिचार्ज प्लानपुरती मर्यादित ठेवलेली नाही, तर युजर्स आपल्या वापरानुसार आणि बजेटनुसार वेगवेगळे प्लान निवडू शकतात.
या ऑफरचा आणखी एक फायदा म्हणजे कॅनव्हा प्रोसोबत 100GB क्लाऊड स्टोरेज मिळते, ज्यामुळे युजर्स आपले डिझाईन्स आणि इतर काम ऑनलाईन सेव्ह करून वेगवेगळ्या डिव्हाईसवरून सहज अॅक्सेस करू शकतात.
कॅनव्हा प्रो आणि कॅनव्हा प्रोलाईट या दोन्ही प्लानमध्ये प्रीमियम डिझाईन कंटेंट, टेम्पलेट्स आणि महत्त्वाची एडिटिंग टूल्स दिली जातात. बॅकग्राऊंड रिमूव्हर, मॅजिक रिसाईज आणि मॅजिक इरेझर हे फीचर्स दोन्ही प्लानमध्ये उपलब्ध आहेत. फरक इतकाच की प्रोलाईटमध्ये 50GB क्लाऊड स्टोरेज मिळते, जे प्रो प्लानच्या तुलनेत कमी आहे.
ही ऑफर मिळवण्यासाठी पात्र जिओ युजर्सना MyJio अॅपमध्ये जाऊन संबंधित ऑफरवर टॅप करून ती अॅक्टिव्हेट करावी लागेल. 16 सप्टेंबर 2026 पासून पात्र रिचार्ज करणाऱ्या युजर्ससाठी ही सुविधा विविध माध्यमांतून उपलब्ध होत आहे. त्यामुळे रिचार्ज केल्यानंतर MyJio अॅपमधील कॅनव्हा ऑफर तपासून घेणे फायद्याचे ठरेल.