होम लोनवर फिक्स्ड, फ्लोटिंग की हायब्रीड व्याजदर? EMI कमी ठेवण्यासाठी काय निवडाल
घर घेताना कर्जाचा व्याजदर कोणता निवडायचा हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. फिक्स्ड, फ्लोटिंग आणि हायब्रीड या तिन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घेतल्याशिवाय निर्णय घेतला तर पुढे जास्त व्याज भरावं लागू शकतं.
स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण हे स्वप्न पूर्ण करताना सगळ्यात मोठं आव्हान असतं ते योग्य होम लोन निवडण्याचं. बँकेत कर्जासाठी गेल्यावर समोर तीन पर्याय ठेवले जातात - फिक्स्ड, फ्लोटिंग आणि हायब्रीड व्याजदर. यातला बरोबर पर्याय निवडला नाही तर पुढे त्याचा फटका बसू शकतो आणि लाखो रुपयांचं जास्तीचं व्याज भरावं लागू शकतं. त्यामुळे या तिन्ही पर्यायांमधला फरक आणि आपल्या आर्थिक परिस्थितीला कोणता पर्याय सूट होतो हे समजून घेणं गरजेचं आहे.
फिक्स्ड होम लोनमध्ये नावाप्रमाणेच पूर्ण कर्जाच्या काळात व्याजदर तेवढाच राहतो. बाजारात व्याजदर वर-खाली झाले तरी EMI वर काहीही परिणाम होत नाही. यामुळे पहिल्या दिवसापासून दर महिन्याला किती EMI जाणार हे नक्की कळतं आणि घरचं बजेट ठरवणं सोपं जातं. पुढे व्याजदर एकदम वाढले तरी त्याचा धक्का बसत नाही. मात्र आजकाल बँका पूर्णपणे फिक्स्ड दराचं होम लोन फारसं देत नाहीत, कारण बाजारातल्या चढ-उतारापासून वाचण्यासाठी त्या फ्लोटिंग दरालाच जास्त पसंती देतात.
भारतातले बहुतेक घर घेणारे फ्लोटिंग रेट कर्जच निवडतात. यात व्याजदर ठरलेला नसतो, तो बाजारातली परिस्थिती आणि आरबीआयच्या रेपो रेटवर अवलंबून असतो. सुरुवातीला हा दर फिक्स्ड रेटपेक्षा बराच स्वस्त असतो, हा याचा मोठा फायदा. शिवाय आरबीआयच्या नियमांनुसार फ्लोटिंग रेट होम लोनवर प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर केलं तरी कुठलाही दंड लागत नाही. पण यात अनिश्चितता कायम असते - महागाई वाढली आणि आरबीआयने रेपो रेट सतत वाढवला, तर EMI चा बोजा आणि कर्जाची मुदत दोन्ही वाढू शकतात. हायब्रीड होम लोन हे फिक्स्ड आणि फ्लोटिंग या दोन्हींचं मिश्रण असतं. कर्जाच्या सुरुवातीला साधारण ३ ते ५ वर्षांसाठी व्याजदर फिक्स्ड ठेवला जातो. हा ठरलेला काळ संपला की कर्ज आपोआप फ्लोटिंग रेटमध्ये बदलतं. नवीन घर घेताना मोठा खर्च येणाऱ्यांसाठी आणि पहिल्या काही वर्षांत EMI मध्ये कुठलाही धोका किंवा बदल नको असणाऱ्यांसाठी हा पर्याय चांगला ठरतो. मात्र फिक्स्ड काळ संपून EMI फ्लोटिंग होतो, तेव्हा तो अचानक बऱ्याच प्रमाणात वाढू शकतो.
कोणता पर्याय कुणासाठी योग्य, याबद्दल तज्ञांचं म्हणणं असं आहे - सुरुवातीला कमी व्याजदर हवा असेल आणि पुढे बोनस किंवा बचतीतून कर्ज लवकर फेडण्याचा विचार असेल, तर फ्लोटिंग रेट होम लोन घ्यावं. दीर्घ काळासाठी हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. सध्या व्याजदर सगळ्यात खालच्या पातळीवर आहेत असं वाटत असेल आणि पुढे ते वाढणारच अशी खात्री असेल, आणि EMI मध्ये कुठलाही अनपेक्षित बदल नको असेल, तर फिक्स्ड होम लोन योग्य ठरतं. तर फक्त पहिली ३ ते ५ वर्षं सुरक्षित आणि ठरलेला EMI हवा असेल आणि नंतर बाजारातल्या चढ-उताराची जोखीम स्वीकारायची तयारी असेल, त्यांनी हायब्रीड रेट निवडावा.