गणपतीनंतर गौरी: महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांत गौरीपूजनाच्या वेगळ्या पद्धती
गणपती आगमनानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकात गौरीपूजनाची परंपरा असते. पण प्रत्येक भागात, प्रत्येक समाजात गौरीचं रूप, पूजेची पद्धत आणि नैवेद्य वेगळा असतो.
गणपती बाप्पा घरी आल्यानंतर महाराष्ट्रात आणि कर्नाटकातही गौरीपूजनाची जुनी परंपरा चालत आलेली आहे. पण गंमत अशी की एकाच सणाचं स्वरूप घरोघरी, समाजागणिक वेगळं दिसतं. कुठे खड्यांची गौर असते, तर कुठे मुखवटा लावून महालक्ष्मी बसवली जाते. रूप वेगळं, पद्धत वेगळी, पण भावना मात्र एकच - माहेरवाशीण म्हणून आलेल्या या देवीचं मनापासून स्वागत करणं.
कोकणस्थ आणि कऱ्हाडे ब्राह्मण समाजात खड्यांच्या गौरी पुजल्या जातात. नदीकाठावरून पाच किंवा सात गुळगुळीत खडे आणून त्यांची पूजा मांडली जाते. घरातली माहेरवाशीण किंवा कुमारिका गौर घरात आणते. उंबरठ्यावर तिचं औक्षण करून रांगोळीच्या पावलांवरून तिला घरात नेलं जातं. घरातल्या प्रत्येक खोलीत तिला फिरवलं जातं - स्वयंपाकघर, धनधान्य, दागिने, पुस्तकांचं कपाट असं घरातलं वैभव तिला दाखवलं जातं. 'इथे काय आहे?' असं विचारलं की 'उदंड आहे' असं उत्तर दिलं जातं. आगमनाच्या दिवशी खिरीचा नैवेद्य, दुसऱ्या दिवशी घावन-घाटल्याचा किंवा पुरणावरणाचा आणि निरोपाच्या दिवशी करंजीचा नैवेद्य दाखवला जातो.
विदर्भात मात्र गौरींना 'महालक्ष्मी' म्हणतात आणि देशस्थ ब्राह्मणांकडे उभ्या गौरी असतात. पितळ, चांदी किंवा इतर धातूंचे मुखवटे धान्याच्या राशीवर ठेवून माहेरवाशिणी त्यांना घरी आणतात. ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन महालक्ष्मींची स्थापना होते. त्यांना साडी, दागिने घालून सजवलं जातं. महापूजेच्या दिवशी सोळा प्रकारची पत्री, फुलं, वेगवेगळ्या भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, पुरणपोळी आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. विदर्भातली आंबील हा या नैवेद्याचा खास भाग आहे. निरोप देताना 'मम गृहे स्थिरा भव' अशी प्रार्थना म्हटली जाते.
कोल्हापूर भागात तांब्यावरच्या गौरींची पद्धत दिसते, तर कोकणातल्या सारस्वत समाजात गौरीला गणपतीची आई मानतात - त्यामुळे महादेवासोबत तिचं आगमन गणेशोत्सव सुरू होण्याआधीच होतं.
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी समाजात तेरडा आणि खड्यांच्या गौरी पुजल्या जातात. माहेरवाशीण तेरडा आणि सात खडे सुपात घेऊन येते, तिच्या पायावर दूध-पाणी घालून, ओवाळून घरात घेतलं जातं. कुंकवाचं पाणी घातलेल्या परातीत पावलं बुडवूनच ती घरात येते आणि रांगोळीच्या पावलांवरून लाल ठसे उमटवत चालत जाते. गृहलक्ष्मी प्रत्येक खोलीत तिचं औक्षण करते, हातावर साखर ठेवून विचारते, "गौरी, गौरी कुठे आलीस?" - मग गौर उत्तर देते. असं संपूर्ण घर फिरून झालं की गणपतीच्या शेजारी गौर बसवली जाते. मग तिला मुखवटा लावून, साडीचोळी नेसवून शृंगारलं जातं आणि सौभाग्यवाणासह खण-नारळाने तिची ओटी भरली जाते. पहिल्या दिवशी खीर, भाजी, भाकरीचा नैवेद्य असतो, दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा, आणि तिसऱ्या दिवशी खीर आणि मुरड घातलेल्या कान्होल्याचा नैवेद्य दाखवला जातो.
कोकणातल्या शेतकरी समाजात तेरड्याच्या पानांची प्रतिमा करून त्यावर मातीचा मुखवटा बसवला जातो, तर बहुजन समाजात मातीच्या मडक्यांची उतरंड रचून गौरीची पूजा केली जाते. कोकणस्थ मराठा समाजात हळदीचा खांब आणि गौरीचा मुखवटा विहिरीवर नेऊन पूजा केली जाते आणि वाजतगाजत घरी आणलं जातं.
या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतींमधून महाराष्ट्राची सांस्कृतिक विविधता दिसते. पूजा, नैवेद्य, रूप आणि विधी वेगळे असले तरी स्वागतामागची भावना एकच - माहेरपणाला आलेल्या या जगन्मातेला प्रेमाने, आदराने आणि आपुलकीने निरोप देणे. गौरी म्हणजे केवळ पूजेची देवता नाही, तर ती प्रत्येक घरातली लेक, माऊली आणि समृद्धीचं मंगल प्रतीक मानली जाते.