गणेशोत्सवातही फुलांना अपेक्षित भाव नाही, शेतकरी अडचणीत
पुरंदर तालुक्यात फुलांचे मोठे उत्पादन होऊनही गणेशोत्सवात अपेक्षेप्रमाणे भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सासवड परिसरात सध्या गणेशोत्सव सुरु आहे आणि पुढे पितृ पंधरवडा, नवरात्र उत्सव आणि दिवाळी असे मोठे सण येऊ घातले आहेत. या सगळ्या सणांमध्ये फुलांना मोठी मागणी असते हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी यंदा वेगवेगळ्या जातीच्या फुलांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले होते. सध्या फुलांची तोडणी सुरु असून बाजारात आवक आणि मागणी दोन्हीही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तरीही अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने खर्च कसा भरून निघणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊनही मनासारखा बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पुरंदर तालुक्यातील शेतकरी विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गुलाब, जरबेरा, मोगरा, तसेच झेंडूच्या विविध जाती, बिजली आणि कापरी अशा फुलांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. यंदा निसर्गाने शेतकऱ्यांवर अवकृपा केली असून कमी पावसामुळे खरीपातील पिके जगवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. एवढे असूनही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिके हाती आणली आहेत. कमी पाण्यावरही मोठ्या मेहनतीने पिके डौलदारपणे उभी आहेत. काही ठिकाणी बाजरीला कणसे येण्याच्या तयारीत असून कापरी, झेंडू, बिजली, तेरडा या फुलांची सर्वत्र तोडणी सुरु आहे.
शेतात सध्या शेतकरी विविध फुलांची तोडणी करताना दिसत आहेत. गणेशोत्सव सुरु असल्याने फुलांना चांगला भाव मिळेल आणि त्यातून बरे उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण बाजारातील परिस्थिती वेगळीच निघाली असून अपेक्षेपेक्षा खूपच कमी भाव मिळत असल्याने निदान खर्च तरी निघेल का, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात झेंडू आणि इतर फुलांना किलोला किमान १०० रुपये भाव मिळत असतो. यंदा मात्र किलोला ५० रुपयेही मिळत नाहीत. गणेशोत्सव अगदी तोंडावर असताना २० ते ३० रुपये असा नीचांकी भाव मिळत होता. त्यात आता २० ते ३० रुपयांची वाढ होऊन साधारण ५० ते ६० रुपये प्रती किलो भाव मिळतो आहे.
शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत, आतापर्यंत झालेला खर्च आणि फुलांची लागण, तोडणी व बाजारात नेण्यापर्यंतचा हिशेब केला तर यात काहीच परवडत नसल्याचे दिसते. फुलांची तोडणी परवडावी आणि थोडेफार हाती राहावे यासाठी अनेक शेतकरी घरचीच माणसे कामाला लावत आहेत, तर काहींना बाहेरून मजूर बोलवावे लागत आहेत. एका मजुराला किमान ३०० रुपये रोज दिला जातो. त्यामुळे पाच जणांनी दिवसभर फुले तोडली तरी त्यातून येणारे उत्पन्न पाहता खर्चही भरून निघत नाही. निदान ८० ते १०० रुपये भाव मिळाला तरच खर्च निघेल, अशी भावना फूल उत्पादक शेतकरी मधुकर कुंभारकर यांनी व्यक्त केली.