Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होणारी शाही बेसन मावा मोदकांची सोपी रेसिपी.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सध्या घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवात सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण असतं. या दिवसांत बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरोघरी वेगवेगळे पदार्थ केले जातात, त्यात उकडीचे मोदक, तळणीचे मोदक आणि सुका मेवा मोदक हे प्रकार आवर्जून बनवले जातात.
पण सणासुदीच्या दिवसांत सगळ्यांनाच खूप घाई असते आणि अशा घाईत नैवेद्यासाठी नेमकं काय बनवावं हे अनेकदा सुचत नाही. अशा वेळी घरात असणारं वाटीभर बेसन आणि थोडा सुका मेवा वापरून झटपट मोदक तयार करता येतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत घरातल्या सगळ्यांनाच मोदक खायला खूप आवडतात. हे शाही बेसन मावा मोदक दोन ते तीन आठवडे व्यवस्थित टिकतात, त्यामुळे उत्सव सुरू होण्याआधीपासूनच हे मोदक बनवून ठेवायलाही हरकत नाही.
हे मोदक बनवण्यासाठी फार साहित्य लागत नाही. बेसन, मावा, पिठीसाखर, तूप, दूध, केशर, वेलची पावडर, डेसिकेटेड कोकोनट आणि सुका मेवा एवढंच साहित्य वापरून हे मोदक तयार होतात.
कृती अगदी सोपी आहे. सर्वप्रथम कढईत तूप गरम करून त्यात वाटीभर बेसन घालावं आणि मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत भाजावं. बेसनातून तूप सुटेपर्यंत हे भाजणं सुरू ठेवायचं.
भाजलेल्या बेसनात साखर, केशर घातलेलं दूध आणि वेलची पावडर घालून हे मिश्रण चमच्याने सतत ढवळत एकसमान करून घ्यावं, म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाहीत.
दुसरीकडे एका वेगळ्या वाटीत बारीक केलेला सुका मेवा, मावा, वेलची पावडर, डेसिकेटेड कोकोनट आणि थोडी पिठीसाखर घालून हे सारणाचं मिश्रणही नीट एकत्र करून घ्यावं.
त्यानंतर मोदकाच्या साच्याला आतून तुपाचा हात लावून घ्यावा, म्हणजे मोदक साच्याला चिकटणार नाहीत. त्यानंतर बेसनाचं मिश्रण साच्यात एकसमान पसरवून त्यात सुक्या मेव्याचं तयार केलेलं मिश्रण भरावं आणि मोदक व्यवस्थित बंद करावा.
अशा प्रकारे तयार झालेल्या मोदकांवर सोन्याचा किंवा चांदीचा वर्ख लावून सजावट केली की गणपती बाप्पासाठीचे शाही बेसन मावा मोदक तयार होतात.