गणेशोत्सवात हवेतही पुणेरी चव; 'कॅफे अकासा'चे खास फराळी मेनू
अकासा एअरने गणेश चतुर्थीनिमित्त प्रवाशांसाठी खास उत्सवी मेनू आणला असून त्यात पुणेरी उसळ, फराळी पॅटिस आणि पुरणपोळी टार्ट यांचा समावेश आहे.
गणेशोत्सवाचा जल्लोष आता फक्त घरात आणि मंडपांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर विमानातसुद्धा हा सण साजरा करता येणार आहे. अकासा एअरने प्रवाशांसाठी खास 'गणेश चतुर्थी स्पेशल मील' सुरू केले आहे. कंपनीच्या इनफ्लाइट फूड सर्व्हिसचे नाव 'कॅफे अकासा' असे असून यंदा सलग पाचव्या वर्षी हे उत्सवी जेवण विमानप्रवाशांना दिले जाणार आहे.
महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतून प्रेरणा घेऊन हा खास मेनू बनवण्यात आला आहे. गणेशोत्सवातील पारंपरिक चवी आणि सणासुदीचं वातावरण डोळ्यासमोर ठेवून खमंग आणि गोड पदार्थांचा मेळ या मेनूत साधण्यात आला आहे. या मीलमध्ये पुणेरी उसळीबरोबर फराळी पॅटिस, पुरणपोळी टार्ट आणि प्रवाशांच्या आवडीचं पेय दिलं जाणार आहे. त्यामुळे विमानात बसूनसुद्धा प्रवाशांना महाराष्ट्राच्या परंपरागत खाद्यपदार्थांची चव घेता येईल.
ही खास सेवा संपूर्ण सप्टेंबर 2026 महिनाभर उपलब्ध राहणार आहे. प्रवाशांना हे मील प्रवासाआधीच बुक करता येईल, त्यासाठी अकासा एअरच्या वेबसाइटवर किंवा मोबाइल अॅपवरून बुकिंग करता येणार आहे. गणेशोत्सवाच्या भावनेतून साकारलेल्या या मेनूमध्ये ओळखीच्या आणि पारंपरिक चवींना आधुनिक टच देण्यात आला आहे. सणाच्या काळातली आपुलकी आणि एकोप्याची भावना प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येतं.
अकासा एअरचा कॅफे अकासा हा मेनू वर्षभर वेगवेगळ्या सण-उत्सवांनुसार आणि खास प्रसंगांनुसार ठराविक काळासाठी बदलत असतो. प्रवाशांच्या आवडीनिवडी आणि ऋतूनुसार यात नवीन पदार्थांची भर पडत असते. ऑगस्ट 2022 मध्ये सेवा सुरू केल्यापासून अकासा एअरने मकरसंक्रांत, व्हॅलेंटाईन डे, होळी, ईद, ईस्टर, मदर्स डे, आंतरराष्ट्रीय योग दिन, नवरोज, ओणम, गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी, बालदिन आणि ख्रिसमस अशा वेगवेगळ्या सणांना अनुसरून प्रादेशिक खाद्यपदार्थ प्रवाशांसमोर आणले आहेत.
कॅफे अकासाच्या नियमित मेनूतही सतत बदल होत असतात आणि प्रवाशांच्या आहारविषयक गरजा व आवडी लक्षात घेऊन तो तयार केला जातो. या मेनूत 45 हून अधिक खाद्यपदार्थांचे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यात फ्यूजन पदार्थ, प्रादेशिक चवीचा टच असलेले ॲपेटायझर्स, स्नॅक्स, विविध पेये आणि डेझर्ट्स यांचा समावेश होतो. हे सगळे पदार्थ भारतातील नामांकित शेफच्या मार्गदर्शनाखाली तयार केले जातात. शिवाय, विमानप्रवासादरम्यान वाढदिवस किंवा एखादा खास प्रसंग साजरा करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी नियमित मेनूतून वेगवेगळे केकही आधीच निवडण्याची सोय आहे. यंदाच्या गणेशोत्सवात विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुणेरी उसळ, फराळी पॅटिस आणि पुरणपोळी टार्टमुळे आकाशातही महाराष्ट्राच्या पारंपरिक चवींचा आस्वाद घेता येणार आहे.