बुधवार, 16 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
22:43 IST

कोरपना तालुक्यात महिलेच्या घरातून ८४६ ग्रॅम गांजा जप्त, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा

गडचांदुरच्या भंडारी कॉलनीतील घरावर पोलिसांची कारवाई, महिलेला मुद्देमालासह ताब्यात

कोरपना तालुक्यात महिलेच्या घरातून ८४६ ग्रॅम गांजा जप्त, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

कोरपना तालुक्यातील गडचांदुर येथे राहत्या घरातून गांजा विकणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मंगळवारी दुपारी गडचांदुर पोलिसांनी भंडारी कॉलनी, वार्ड क्रमांक ४ येथील एका घरावर छापा टाकला आणि सुमारे ४२ हजार ३०० रुपये किमतीचा ८४६ ग्रॅम गांजा जप्त केला.

या प्रकरणात नमिता विवेकानंद बिस्वास (वय ३७, रा. भंडारी कॉलनी, वार्ड क्र. ४, गडचांदुर) हिच्याविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (एनडीपीएस अ‍ॅक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.

गडचांदुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश राजेंद्र अनभुले यांना मंगळवारी दुपारी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, भंडारी कॉलनी भागातील नमिता बिस्वास ही महिला स्वतःच्या घरात गांजा हा अंमली पदार्थ ठेवून त्याची चोरटी विक्री करत आहे. ही माहिती खरी असल्याची खात्री झाल्यावर तात्काळ पोलीस स्टेशनच्या दैनंदिनीत नोंद घेतली गेली आणि पोलीस निरीक्षक शिवाजी कदम व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना लेखी अहवाल देण्यात आला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कायदेशीर प्रक्रिया पाळत सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे दोन शासकीय पंच, वजनमाप तज्ज्ञ आणि छायाचित्रकार यांना बोलावण्यात आले. पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या उपस्थितीत आणि महिला पोलीस उपनिरीक्षक राधिका गायकवाड यांच्यासह पथकाने दुपारी भंडारी कॉलनीतील संबंधित घराला घेराव घातला.

घटनास्थळी असलेल्या संशयित महिला नमिता बिस्वास हिला एनडीपीएस कायद्याच्या कलम ५० नुसार झडतीबाबत कायदेशीर नोटीस देण्यात आली. त्यानंतर पंचांसमोर तिच्या घराची कसून झडती घेतली असता, बेडरूममधील पलंगाखाली एका पांढऱ्या पिशवीत लपवलेला गांजासदृश अंमली पदार्थ पोलिसांना सापडला. प्राथमिक चौकशीत हा पदार्थ विक्रीसाठी आणल्याची कबुली संबंधित महिलेने दिली. वजनमाप तज्ज्ञांनी इलेक्ट्रॉनिक काट्यावर मोजणी केली, तेव्हा त्या पांढऱ्या पिशवीत हिरवट पाने, फुले आणि बोंडे असलेला एकूण ८४६ ग्रॅम वजनाचा आणि सुमारे ४२ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा असल्याचे निष्पन्न झाले.

पथकाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत रासायनिक विश्लेषणासाठी २४-२४ ग्रॅमचे दोन स्वतंत्र नमुने सीलबंद केले, तर उर्वरित ७९६ ग्रॅम गांजा पंचांसमोर सील करून जप्त करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गणेश अनभुले यांच्या फिर्यादीवरून गडचांदुर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी नमिता बिस्वास हिच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक राधिका गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ