MSRTC NCMC कार्ड: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा
बायोमेट्रिक ठसे जुळत नसल्यास आधार OTPचा पर्याय, तसेच हरवलेले किंवा चोरीला गेलेले NCMC कार्ड पुन्हा मिळवण्याची सुविधाही एसटी महामंडळाने सुरू केली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) NCMC कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. एसटी बसमधून सवलतीने प्रवास करणाऱ्या या तीन गटांतील प्रवाशांना आता NCMC कार्ड नोंदणी करून घ्यावी लागते. प्रवाशांना सवलत अधिक सोप्या पद्धतीने मिळावी यासाठी महामंडळाने काही महत्त्वाचे बदल केले असून, संबंधित लाभार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या अमृत ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांचे बोटांचे ठसे बायोमेट्रिकमध्ये जुळत नाहीत, अशा लाभार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने एक नवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. दि. २१ सप्टेंबर २०२६ पासून हा पर्याय लागू होणार आहे. यानुसार अशा लाभार्थ्यांना बोटांचे ठसे देण्याऐवजी आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर येणाऱ्या OTPच्या आधारे NCMC कार्डची नोंदणी करता येईल. यामुळे बायोमेट्रिक प्रमाणीकरणात अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याशिवाय, हरवलेले किंवा चोरीला गेलेले NCMC कार्डही आता पुन्हा मिळवता येणार आहे. यापूर्वी असे कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता दि. २१ सप्टेंबरपासून असे कार्ड ब्लॉक करून रु. १९९ शुल्क भरल्यानंतर नव्याने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दि. १९ सप्टेंबरपर्यंत ज्या लाभार्थ्यांनी NCMC कार्डसाठी नोंदणी केली असेल, त्या सर्व लाभार्थ्यांना दि. २५ सप्टेंबर २०२६ पासून कार्ड वितरणासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
दि. १६ सप्टेंबरपासून NCMC कार्डसाठी नोंदणी करणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांना QR कोड असलेली पावती दिली जाणार आहे. ही पावती एसटीच्या ईटीआयएम मशीनवर स्कॅन केल्यानंतर संबंधित सवलतधारकाला सवलतीचे तिकीट मिळेल. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार आहे. दरम्यान, नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनी ३० दिवसांच्या आत आपले NCMC कार्ड Active करून त्यामध्ये Top-up करणे गरजेचे आहे. सवलतीचा प्रवास अखंडपणे सुरू राहावा यासाठी लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
एसटी प्रवासातील सवलतीचा फायदा घेण्यासाठी सर्व संबंधित सवलतधारक लाभार्थ्यांनी तातडीने NCMC कार्ड नोंदणी करून घ्यावी, असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. सवलतीच्या प्रवासाची ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाकडून हे बदल केले जात आहेत.