EPFO: घर, शिक्षण, लग्न किंवा हॉस्पिटल बिलासाठी आता पीएफमधून पैसे काढणं सोपं
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ खात्यातून ॲडव्हान्स रक्कम काढण्याच्या 5 कारणांबद्दल आणि मर्यादांबद्दल स्पष्टता दिली आहे.
नोकरी करणाऱ्या माणसाच्या निवृत्तीनंतरचं आयुष्य सुरक्षित राहावं, यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ काम करते. पण फक्त निवृत्तीच नाही, तर अचानक उभं राहणारं आर्थिक संकट असतानाही ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या मदतीला येते. हॉस्पिटलचं बिल, मुलांचं उच्च शिक्षण, लग्नाचा खर्च किंवा स्वतःचं घर घेण्याचा विचार असेल, तर अशा वेळी मोठी रक्कम एकदम हातात लागते. अशा प्रसंगी कर्मचाऱ्याला त्याच्या पीएफ खात्यातून काही रक्कम ॲडव्हान्स स्वरूपात, म्हणजे आधीच काढून घेण्याची सोय आहे.
ईपीएफओने आता याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे. पीएफ खातेधारकाला एकूण 5 वेगळ्या परिस्थितींमध्ये आपल्या फंडातून पैसे काढता येतात. प्रत्येक कामासाठी किती वेळा आणि किती रक्कम काढता येईल, याच्या ठराविक मर्यादाही ईपीएफओने ठरवून दिलेल्या आहेत.
पहिलं कारण म्हणजे मेडिकल इमर्जन्सी किंवा आजारपण. कर्मचाऱ्याला स्वतःला, किंवा त्याच्या पती-पत्नीला, मुलांना अथवा आई-वडिलांना उपचारासाठी पैसे लागत असतील, तर पीएफमधून रक्कम काढता येते. यात एक गोष्ट लक्षात घ्यायची, ती म्हणजे वैद्यकीय उपचारासाठी काढल्या जाणाऱ्या रकमेवर कुठलीच कमाल मर्यादा नाही.
दुसरं कारण मुलांच्या शिक्षणाचं. 10 वी नंतरच्या उच्च शिक्षणाचा खर्च भरण्यासाठी पीएफचे पैसे वापरता येतात. मात्र संपूर्ण सदस्यत्व कालावधीत या कारणासाठी जास्तीत जास्त 10 वेळाच पैसे काढता येतात.
तिसरं कारण लग्नाचा खर्च. स्वतःच्या, मुलांच्या किंवा भाऊ-बहिणीच्या लग्नासाठी पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची सुविधा आहे. ही सुविधा पूर्ण नोकरीच्या काळात जास्तीत जास्त 5 वेळाच घेता येते.
चौथं कारण घर खरेदी किंवा घराचं बांधकाम. नवीन घर किंवा प्लॉट घेणं, घर बांधणं, होम लोनचे हप्ते भरणं किंवा घराची दुरुस्ती करणं, या सगळ्यासाठी पीएफमधून पैसे काढता येतात. घराशी संबंधित या सगळ्या कामांसाठी नोकरीच्या काळात एकूण जास्तीत जास्त 5 वेळा ही सुविधा वापरता येते.
पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे विशेष परिस्थिती, जसं नैसर्गिक आपत्ती किंवा कंपनी बंद पडणं, ज्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने अधिसूचित केलेल्या असतील. या कारणासाठी एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 2 वेळाच पैसे काढता येतात.
ईपीएफओच्या नवीन नियमांनुसार, कर्मचारी ईपीएफओचा सदस्य होऊन जर 12 महिने म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं असेल, तर तो त्याच्या एकूण ईपीएफ शिल्लक रकमेच्या जास्तीत जास्त 75 टक्के हिस्सा ॲडव्हान्स म्हणून काढू शकतो. यातल्या कोणत्याही वैध कारणासाठी ही रक्कम काढता येते.
दरम्यान, ईपीएफओने सदस्यांपर्यंत सेवा अधिक सोप्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी व्हॉट्सॲप मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर आपलं अधिकृत चॅनल सुरू केलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत ईपीएफओने सदस्यांना हे चॅनल जॉईन करण्याचं आवाहन केलं आहे. या चॅनलमुळे कर्मचाऱ्यांना पीएफशी संबंधित सगळे नवीन अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती घरबसल्या मिळेल. यासाठी ईपीएफओने पोस्टमध्ये एक क्यूआर कोडही शेअर केला आहे, जो स्कॅन करून सदस्य थेट चॅनलशी जोडले जाऊ शकतात.