इराणकडून भेट मिळालेल्या गाढवांनी इस्रायलच्या वाळवंटात ४४ वर्षांत उभी केली हिरवाई
नेगेव वाळवंटातील रामोन क्रेटर भागात इराणकडून आलेल्या ११ जंगली गाढवांच्या वंशजांनी दुष्काळी जमिनीचे रूपांतर हिरव्यागार टापूत केले आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला इस्रायलच्या नेगेव वाळवंटात जंगली गाढवे मोठ्या संख्येने दिसायची. पण अनियंत्रित शिकारीमुळे ही प्रजाती या भागातून पूर्णपणे नष्ट झाली होती. वाळवंटातली ढासळलेली परिसंस्था पुन्हा उभी करण्यासाठी आणि निसर्गाचा तोल सांभाळण्यासाठी इस्रायली अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी एक धाडसी योजना आखली, ती म्हणजे या जमिनीवर पुन्हा एकदा जंगली गाढवांचे वास्तव्य निर्माण करायचे. यासाठी आणलेली गाढवे साधी पाळीव नव्हती, तर नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या 'पर्शियन ओनेजर' आणि 'आफ्रिकन वाईल्ड अॅस' या दुर्मिळ जंगली प्रजातींची होती. ही गाढवे इस्रायलमध्ये आणण्यासाठी मोठी आंतरराष्ट्रीय राजनैतिक हालचाल आणि एक धाडसी मोहीम राबवावी लागली.
१९७९ साली इराणमध्ये इस्लामिक क्रांती होण्याआधी इराण आणि इस्रायल यांचे संबंध चांगले आणि मैत्रीचे होते. याच काळात इस्रायलच्या 'नेचर अँड पार्क्स अथॉरिटी'चे तत्कालीन महासंचालक अव्राहम योफे यांनी इराणचे शाह मोहम्मद रझा पहलवी यांच्याशी गुप्तपणे बोलणी केली. या बोलण्यानंतर १९६८ मध्ये इराणच्या शाही अभयारण्यातून ११ जंगली गाढवे इस्रायलला भेट म्हणून दिली गेली. ही गाढवे विमानाने सुरक्षितपणे योतवाता वन्यजीव अभयारण्यात आणली गेली. पुढे या गाढवांमध्ये अनुवांशिक विविधता टिकवण्यासाठी इस्रायलने आफ्रिकेतील इथिओपियातून खास जहाजे आणि ट्रकच्या मदतीने आफ्रिकन जंगली गाढवेही आणली. योतवाता अभयारण्यात शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली या गाढवांचा प्रजनन कार्यक्रम सुरू झाला.
जवळपास एक दशक प्रजनन आणि संगोपन केल्यानंतर १९८२ मध्ये इस्रायली शास्त्रज्ञांनी २८ निरोगी जंगली गाढवांचा पहिला गट नेगेव वाळवंटातील अत्यंत कोरड्या आणि खडतर अशा रामोन क्रेटर भागात सोडला. या गाढवांनी तिथल्या वातावरणाशी जुळवून घेत स्वतःमध्ये अद्भुत बदल घडवून आणले. आज ४४ वर्षांनंतर या वाळवंटी भागात गाढवांची संख्या ५०० ते ६०० च्या पुढे गेली आहे. ही गाढवे ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने पळू शकतात. ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान सहन करण्याची क्षमता त्यांच्या शरीराने कमावली असून पाण्याशिवाय अनेक दिवस जगण्याची ताकद त्यांच्यात आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराचे वजन ३० टक्क्यांपर्यंत घटले तरी ही गाढवे तग धरतात.
या गाढवांनी फक्त स्वतःचा जीव वाचवला असे नाही, तर संपूर्ण वाळवंटाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. कडक उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात ही गाढवे वाळूत पायांनी खड्डे खणतात. या खड्ड्यांमध्ये साचणारे पाणी प्यायला मिळाल्याने कोल्हे, हरणे आणि इतर वन्यजीवांना दुष्काळातही जगण्याचा आधार मिळतो. शिवाय ही गाढवे वाळवंटातील बाभळीची झाडे आणि त्यांची फळे खातात. त्यांच्या पचनसंस्थेतल्या रसांमुळे बियांचे कठीण आवरण मऊ पडते आणि मैलोन्मैल प्रवास करून शेणावाटे या बिया वाळवंटात पसरतात, त्यातून नवीन झाडे उगवायला मदत होते. गाढवांच्या याच रोजच्या हालचालींमुळे रामोन क्रेटर परिसर आज हिरव्यागार टापूत बदलला असून जगभरातील पर्यावरणतज्ज्ञ या मॉडेलचा अभ्यास करत आहेत.