दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंचा खुलासा, म्हणाले - मी तिला कधीच भेटलेलो नाही
सहा वर्षांपूर्वीच्या दिशा सालियन आत्महत्या प्रकरणात पुन्हा चौकशीची मागणी होत असताना आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून आपली बाजू मांडली आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सहा वर्षांपूर्वी अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते, त्यात बड्या नावांचा उल्लेख झाला होता. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूआधी त्याची सेक्रेटरी दिशा सालियन हिचाही आत्महत्येने मृत्यू झाला होता. ही आत्महत्या होती की हत्या, असा प्रश्न विरोधी पक्षांनी त्यावेळी उपस्थित केला होता आणि याच प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव जोडले गेले होते.
आता पुन्हा एकदा दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप दिशा सालियन हिचे वडील आणि त्यांच्या वकिलांनी केला आहे. दिशा सालियन हिच्या वडिलांनी सीबीआयकडे आपला जबाब नोंदवला असून त्यात माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच इतर काही मोठ्या नेत्यांची नावे घेतली आहेत. आपल्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, असा आरोप या जबाबात करण्यात आला आहे. या जबाबाच्या आधारे सीबीआयने गुन्हा दाखल केला असला तरी गुन्हा दाखल करताना कोणाचेही नाव त्यात घेण्यात आलेले नाही.
या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करत यासंदर्भातील आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. अफवांचे पीक थांबवण्यासाठी पुन्हा एकदा केवळ वस्तुस्थिती सांगत असल्याचे नमूद करत ते म्हणाले की, आपण दिशा सालियन यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी आपली ओळखही नव्हती. राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापोटी आणि चारित्र्यहनन करण्याच्या उद्देशाने काही लोकांकडून गेल्या सहा वर्षांपासून या दुर्दैवी घटनेशी कोणताही पुरावा किंवा संबंध नसताना वारंवार आपले नाव जोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
कोणताही आधार नसलेली ही सतत सुरू असलेली खोटी मोहीम दुर्दैवी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. गोंधळ घालणाऱ्या टीव्ही चॅनल्सवरील खोट्या चर्चा आणि मीडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. अधिकृत यंत्रणांना कोणत्याही अडथळ्याशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निष्पक्षपणे या प्रकरणाची चौकशी पुन्हा नव्याने करू द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
अशा प्रकारच्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने आपल्याला गप्प बसवता येईल, असे कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. सत्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध देशवासीयांना सोबत घेऊन आपला लढा सुरूच राहील, असे त्यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी नमूद केले.