दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास आता गोल्ड मेडलिस्ट अधिकारी सीमा पाहुजा यांच्याकडे
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यूला सहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. बॉम्बे हायकोर्टाच्या निर्देशानंतर सीबीआयने या प्रकरणी औपचारिक एफआयआर नोंदवला आहे. या अत्यंत संवेदनशील प्रकरणाच्या तपासाची आणि चौकशीची सर्व सूत्रे आता सीबीआयच्या अनुभवी महिला अधिकारी सीमा पाहुजा यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. सहा वर्ष जुने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, आता या तपासाकडून काय समोर येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
सीमा पाहुजा सध्या दिल्लीतील सीबीआय मुख्यालयातील स्पेशल क्राईम युनिटमध्ये पोलीस अधीक्षक (एसपी) म्हणून काम करत आहेत. त्यांना गुन्हेगारी तपासाचा मोठा आणि यशस्वी अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशातील चर्चेतील हाथरस प्रकरण, उन्नाव बलात्कार प्रकरण, शिमला येथील 'गुड़िया' मर्डर मिस्ट्री आणि 2024 सालच्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरणासारख्या हाय-प्रोफाईल आणि गुंतागुंतीच्या केस यशस्वीपणे हाताळल्या आहेत. या सगळ्या प्रकरणांमध्ये देशभर मोठी चर्चा झाली होती आणि तरीही त्यांनी हे तपास यशस्वीपणे पूर्ण केले. त्यांच्या या तपासकामाची दखल घेत 2021 मध्ये त्यांना 'सर्वोत्कृष्ट तपास अधिकारी' या सुवर्णपदकाने गौरवण्यात आले होते. गुन्ह्यांच्या कड्या जोडणे आणि आधुनिक फॉरेन्सिक पुराव्यांचा अचूक वापर करणे हे त्यांचे खास कौशल्य मानले जाते.
सीबीआयने दिशा सालियन प्रकरणात एफआयआर दाखल केल्यानंतर आता सीबीआयचे पथक तिच्या मृत्यूशी संबंधित जुन्या नोंदी आणि उपलब्ध पुराव्यांची पुन्हा तपासणी करणार आहे. तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, दिशाच्या मृत्यूपूर्वी म्हणजेच 8 जून 2020 च्या रात्री तिचा होणारा पती रोहन रॉय याच्या घरी झालेल्या पार्टीत उपस्थित असलेल्या सगळ्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. याशिवाय त्यावेळचा पोलीस तपास, घटनास्थळाच्या नोंदी, न्यायवैद्यक साहित्य आणि इतर उपलब्ध कागदपत्रांचीही तपासणी केली जाणार आहे. या सगळ्या जुन्या नोंदी आणि पुरावे पुन्हा एकदा बारकाईने तपासले जाणार असल्यामुळे हा तपास वेळखाऊ आणि गुंतागुंतीचा ठरू शकतो.
दिशा सालियनच्या मृत्यूला सहा वर्षांहून अधिक काळ लोटला असल्यामुळे तपास यंत्रणेसमोर जुने पुरावे, नोंदी आणि साक्षीदारांची माहिती पुन्हा तपासण्याचे मोठे आव्हान असणार आहे. सीबीआयने संबंधित कागदपत्रे आणि नोंदी गोळा करण्याचे काम आधीच सुरू केले आहे. सीबीआयच्या एफआयआरमध्ये अनेक नावे आणि आरोपांचा उल्लेख असला तरी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एफआयआरमध्ये कोणत्याही व्यक्तीला आपोआप आरोपी मानले जात नाही. तपासादरम्यान समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारेच संबंधित व्यक्तीची भूमिका निश्चित केली जाणार आहे. सीमा पाहुजा यांच्या नेतृत्वाखालील सीबीआय तपास या सहा वर्षे जुन्या प्रकरणात कोणत्या तथ्यांपर्यंत आणि पुराव्यांपर्यंत पोहोचतो, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.