दिशा सालियान प्रकरणी सीबीआयच्या एफआयआरनंतर सूरज पंचोलीचे पहिले जाहीर निवेदन
सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर अभिनेता सूरज पंचोलीने सोशल मीडियावर निवेदन देत आरोप फेटाळले.
दिवंगत दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफआयआर दाखल केल्यानंतर अभिनेता सूरज पंचोली पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्यावर सातत्याने होणाऱ्या आरोपांबाबत आजवर गप्प असलेल्या सूरजने यावेळी मौन सोडत सोशल मीडियावर एक सविस्तर निवेदन शेअर केले.
गेल्या काही वर्षांपासून मीडिया रिपोर्ट्स आणि विविध वक्तव्यांतून आपले नाव दिशा सालियानच्या मृत्यूशी जोडले जात असल्याने या प्रकरणातील खरी माहिती सर्वांसमोर मांडणे गरजेचे झाल्याचे त्याने म्हटले आहे.
निवेदनात सूरज पंचोलीने स्पष्टपणे सांगितले की, "मला हे अगदी स्पष्टपणे सांगायचे आहे की, मी दिवंगत दिशा सालियानला माझ्या आयुष्यात कधीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भेटलेलो नाही. तसेच शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनाही मी आयुष्यात कधीच भेटलेलो नाही." अनेक वर्षे या प्रकरणाशी आपले नाव जोडले जात असल्याने कमालीचा त्रास झाल्याचेही त्याने नमूद केले.
तपास यंत्रणांच्या कारवाईबद्दल बोलताना सूरजने सांगितले की, सीबीआय आणि पोलिसांनी काही वर्षांपूर्वीच या प्रकरणात त्याची सखोल चौकशी करून त्याचा जबाब नोंदवला होता. "माझ्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही," असे थेट सांगत त्याने तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. पुढेही चौकशी झाली किंवा आणखी माहिती मागितली गेली, तरी आपण त्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.
कोणताही ठोस पुरावा नसताना आपले नाव या प्रकरणाशी जोडले जाणे अन्यायकारक असून त्यामुळे मानसिक त्रास होत असल्याचे सूरजने म्हटले. गेल्या काही वर्षांत अनेक दावे आणि बातम्या समोर आल्या तरी आपण आतापर्यंत गप्प राहणे पसंत केले होते. पण सातत्याने बदनामी होत असल्याने आता स्वतःची बाजू मांडणे भाग पडल्याचे त्याने सांगितले. एका व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूचा आधार घेऊन कोणत्याही पुराव्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीची प्रतिमा डागाळणे योग्य नाही, अशा खोट्या माहितीची चौकशी तपास यंत्रणांनी करावी, असे आवाहनही त्याने केले.
माध्यमांमधील चर्चांवर भाष्य करताना सूरज पंचोलीने शेवटी ठामपणे सांगितले की, "हेडलाईन म्हणजे पुरावा नाही आणि चर्चा म्हणजेही पुरावा नाही." देशाच्या कायद्यावर आणि तपास यंत्रणांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सांगत सत्य लवकरच सर्वांसमोर येईल, अशी आशा त्याने व्यक्त केली. सीबीआयच्या या ताज्या कारवाईमुळे आणि सूरजच्या या निवेदनामुळे दिशा सालियान प्रकरणातील राजकीय व सामाजिक चर्चेला पुन्हा एकदा नवीन वळण मिळाले आहे.