लक्ष्मण हाके : 'अभिजीत दीपके अजून बच्चा, सामाजिक न्यायाबद्दल कच्चा,' जरांगेंना पाठिंबा दिल्याने हाकेंचा संताप
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला 14 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांची भेट घेणाऱ्या सीजेपीच्या अभिजीत दीपके यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आज 14 दिवस पूर्ण झाले आहेत. इतके दिवस सलग उपोषण सुरू असल्यामुळे त्यांची तब्येत खालावली असून मराठा आरक्षणाचा लढा आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. उद्या अंतरवाली सराटी या गावात मराठा बांधवांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईत करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे सगळं सुरू असतानाच जरांगे पाटील यांची तब्येत बिघडल्यानंतर सीजेपी या संघटनेचे अभिजीत दीपके यांनी त्यांची जाऊन भेट घेतली. मात्र या भेटीवरूनच ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके चांगलेच संतापले आहेत. त्यांनी अभिजीत दीपके यांच्यावर जोरदार शब्दांत टीका करत त्यांना थेट इशाराही दिला आहे.
माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, अभिजीत दीपके अजून बच्चा आहे, तो एक छोटासा कार्यकर्ता आहे. ते अमेरिकेतून आले असल्यामुळे महाराष्ट्रातील जातवास्तव आणि जात वर्चस्वाची नेमकी परिस्थिती काय आहे, हे त्यांना पूर्णपणे माहिती नाही, असा टोला हाके यांनी लगावला. त्यामुळे आधी दीपकेंनी आपला अभ्यास वाढवावा आणि दलित चळवळीचा नीट अभ्यास करावा, असा सल्लाही हाके यांनी दिला.
मनोज जरांगेंना पाठिंबा देणे म्हणजे जात वर्चस्वाला पाठिंबा देण्यासारखेच आहे, असा गंभीर आरोपही हाके यांनी यावेळी केला. तसेच जरांगे पाटील ज्या भाषाशैलीत बोलतात, त्यावरूनही त्यांनी दीपकेंना सवाल उपस्थित केला.
अभिजीत दीपके यांनी याआधी सोनम वांगचुक आणि मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेवरूनही हाके यांनी जोरदार टीका केली. एका बाजूला पद्मश्री पुरस्कारप्राप्त, आयआयटी इंजिनीअर आणि शिक्षणतज्ज्ञ असलेले सोनम वांगचुक आहेत, तर दुसऱ्या बाजूला जरांगे आहेत. या दोघांची तुलना कशी काय होऊ शकते, असा सवाल हाके यांनी यावेळी उपस्थित केला.
"अभिजीत दीपके अजून बच्चा आहे, सामाजिक न्यायाबाबत तो कच्चा आहे," असं म्हणत हाके यांनी दीपकेंना सामाजिक प्रश्नांचा आणखी अभ्यास करण्याचा सल्ला दिला.
शिक्षण आणि भ्रष्टाचाराविरोधातील भूमिकेला आपण पाठिंबा दिला होता, हे हाके यांनी स्पष्ट केलं. मात्र झुंडशाहीची भाषा करणाऱ्या जरांगे पाटलांच्या नादी लागू नये, असा सल्लाही त्यांनी दीपकेंना दिला.
यापुढेही दीपके यांनी वारंवार जरांगे यांच्या समर्थनाची भूमिका घेतली, तर त्यांनाही आम्ही सोडणार नाही, असा थेट इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता मराठा आणि ओबीसी समाजांमधील संघर्षाचा राजकीय वाद पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.