चंद्रपुरात मोदींच्या वाढदिवशी मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आशीर्वाद दिवा प्रज्वलन, ७६ फुटांचा केक कापला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त चंद्रपुरातील गांधी चौकात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करण्यात आला.
चंद्रपुरातील गांधी चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त एक भावनिक कार्यक्रम पार पडला. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने या निमित्ताने आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करण्यात आला.
बेटी बचाओ, बेटी पढाओ हा संदेश देत मुनगंटीवार यांची नात शूरवी हिच्यासह ३५ चिमुकल्या मुलींच्या हस्ते ७६ फुटांचा केक कापण्यात आला. या मुलींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे मुखवटे परिधान केले होते. या कार्यक्रमाला पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिमुकल्या मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भारत माता की जय या जयघोषाने गांधी चौकातील वातावरण भारावून गेले होते. मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रज्वलित करण्यात आलेल्या या दिव्यातून त्यांच्या हातून देशसेवेचे काम असेच सुरू राहावे, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला महानगराच्या महापौर संगीता खांडेकर, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिंग चंदेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, सपना मुनगंटीवार, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, रवी लोणकर, जयश्री जुमडे, छबू वैरागडे, सुनीता जयस्वाल, सविता सरकार, प्रज्वलंत कडू, ब्रिजभूषण पाझारे, सूरज पेदूलवार, प्रकाश धारणे, विशाल निंबाळकर, मुग्धा खांडे, नम्रता ठेमस्कर आणि शुभांगी शर्मा हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की, आशीर्वादाचा दिवा हा केवळ एक दिवा नसून देशाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचावी, गरिबांच्या घरात आनंद निर्माण व्हावा यासाठीचा चंद्रपूरचा आशीर्वाद आहे. मोदी यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. पुढील ३६५ दिवसांत जिथे अंधार असेल तिथे विकासाचा दिवा घेऊन जाण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांचा उल्लेख करताना मुनगंटीवार यांनी प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि पीएम विश्वकर्मा योजना यांची नावे घेतली. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास, आत्मनिर्भर भारत आणि वोकल फॉर लोकल या संकल्पांचाही त्यांनी उल्लेख केला.
चांद्रयान-३ च्या यशाचा दाखला देत भारत आता जगाच्या मागे न राहता जगाला सोबत घेऊन पुढे जाणारा देश असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यात ४७४ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती झाली असून पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी नमूद केले.
आमदार मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना केली.