चंद्रपुरातील ४०० वर्षे जुन्या महाशिवलिंगाचे नवे मंदिर, अमृता फडणवीस यांची उपस्थिती
लालपेठ-भिवापूर भागातील पुरातन महाशिवलिंगाला ४०० वर्षांनंतर मंदिराचे छत्र मिळाले, आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने काम पूर्ण झाले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
चंद्रपुरातील लालपेठ आणि भिवापूर भागात असलेल्या राज्यातील सर्वात मोठ्या पुरातन महाशिवलिंगाच्या जीर्णोद्धाराचा धार्मिक सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. जवळपास ४०० वर्षे उघड्यावर असलेल्या या शिवलिंगाला आता भव्य मंदिररूपी छत्र मिळाले असून, या सोहळ्याला अमृता देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
हे मंदिर आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या स्वखर्चातून उभारण्यात आले आहे. हिमाचल प्रदेश आणि नेपाळच्या पारंपरिक स्थापत्यशैलीचा प्रभाव या मंदिराच्या रचनेत दिसून येतो. जोरगेवार यांनी सांगितले की, गेल्या श्रावण महिन्यात त्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केला होता आणि तो याच श्रावणात पूर्ण करण्यात आला. या कामात मंदिराची उभारणी तर झालीच, पण संपूर्ण परिसराचेही रुपडे पालटले.
सोहळ्यासाठी अमृता फडणवीस कावड घेऊन मंदिर परिसरात दाखल झाल्या. त्यांच्या उपस्थितीत शिवलिंगाचे पूजन, मंत्रोच्चारातील महाअभिषेक, महाआरती आणि महाकाल शृंगार दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भाविक यावेळी दर्शनासाठी उपस्थित होते. आमदार जोरगेवार यांच्या विनंतीवरून अमृता फडणवीस यांनी "शिवतांडव स्तोत्र" सादर केले, ज्यामुळे उपस्थित भाविकांमध्ये उत्साह निर्माण झाला.
यावेळी बोलताना जोरगेवार म्हणाले की, गेल्या वर्षी अमृता फडणवीस चंद्रपुरात आल्या असताना त्यांनी हे शिवलिंग पाहिले आणि भोलेनाथ असे उघड्यावर असणे योग्य नाही, इथे भव्य मंदिर व्हायला हवे, असे म्हटले होते. त्यांचे हेच शब्द आपल्यासाठी संकल्पाचे शब्द ठरले, असे जोरगेवार यांनी सांगितले. देशाच्या मध्यभागी चंद्रपूर असल्याने, ज्यांना बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणे शक्य होत नाही, अशा भाविकांनी या शिवलिंगाचे दर्शन घ्यावे, या उद्देशाने मंदिराच्या विकासाची कल्पना पुढे नेण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. मंदिर उभारणीच्या काळात अनेकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आणि काम थांबवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न झाले, मात्र हे काम केवळ मंदिरासाठी नसून चंद्रपूरच्या श्रद्धेसाठी आणि भविष्यासाठी असल्याने ते थांबले नाही, असे जोरगेवार म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात संरक्षण मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अमृता फडणवीस यांनीही मंदिराच्या उभारणीचे कौतुक केले. "मागील वर्षी मी इथे आले होते आणि यंदाही येण्याचा योग आला. मंदिराचे काम थांबवण्याचे प्रयत्न झाले, पण शक्तीपेक्षा श्रद्धा मोठी असते, त्यामुळे हे मंदिर इथे उभे राहिले. शिवतांडव म्हणजेच बदल आणि परिवर्तन," असे त्या म्हणाल्या. कावड घेऊन येण्याचा आनंद झाल्याचेही त्यांनी सांगितले.
सोहळ्याला जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, वेकोलिचे व्यवस्थापक संजीवसिंग रेड्डी, मंदिर समितीचे अध्यक्ष शंकर बल्लेपवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. सोहळ्यादरम्यान विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच परिसरात उभारण्यात येणाऱ्या दोन कोटी रुपयांच्या इमारतीचे भूमिपूजनही यावेळी पार पडले.