ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान भारतात, विमानाला खास सुरक्षा कवच
युद्धजन्य परिस्थितीमुळे इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या विमानाला विशेष सुरक्षा कवच देण्यात आले असून ते ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात दाखल झाले आहेत.
नवी दिल्लीत होणाऱ्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जगातल्या मोठ्या नेत्यांचे आगमन सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली १२ आणि १३ सप्टेंबरला भारत मंडपम इथे ही परिषद होणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आधीच पोहोचले आहेत आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह इतर मोठ्या देशांचे प्रमुखही या परिषदेला येत आहेत. पण या सगळ्या व्हीव्हीआयपी पाहुण्यांमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत आणि सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठरला आहे तो इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचा दौरा. मध्य पूर्वेत अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेला इराणचा संघर्ष बघता, पेझेश्कियान यांचे विमान आणि त्यांची सुरक्षा ही जागतिक यंत्रणांसाठी काळजीचा विषय बनली आहे.
पेझेश्कियान तेहरानहून थेट भारताकडे उडाले आहेत. हा त्यांचा पहिलाच भारत दौरा असून ते ११ सप्टेंबरला दुपारी पालम हवाई तळावर उतरणार आहेत. इराणचं व्हीव्हीआयपी विमान तेहरानहून उडाल्यानंतर इराणी हवाई हद्दीतून बाहेर पडून पाकिस्तानच्या हवाई हद्दीत जाईल आणि तिथून भारतीय हवाई हद्दीत येईल. हा मार्ग सगळ्यात थेट आणि जलद असला तरी, मध्य पूर्वेतल्या युद्धामुळे हा संपूर्ण प्रवास खूप धोक्याचा मानला जातो आहे.
पेझेश्कियान यांच्या प्रवासातला सगळ्यात असुरक्षित टप्पा म्हणजे इराणची स्वतःची हवाई हद्द आणि तिथून बाहेर पडण्याचा मार्ग. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इराणचं आकाश सतत तणावात असतं. अलीकडे इराणच्या सरकारी विमानांना आणि उच्चपदस्थांना लक्ष्य केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. जून २०२५ मधल्या १२ दिवसांच्या युद्धात तेहरानमधल्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीवर झालेल्या हल्ल्यात पेझेश्कियान स्वतः किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांचं खास विमान 'इराण०२' तेहरानहून उडतं, तेव्हा सुरुवातीची काही मिनिटं सगळ्यात धोक्याची असतात.
इराणी हवाई हद्द ओलांडल्यावर हे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत जाईल. पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द बंद केली असली, तरी इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या विमानासाठी कोणतेही निर्बंध नाहीत. जूनमध्येही पाकिस्तानने पेझेश्कियान यांच्या विमानाला लढाऊ विमानांचं खास सुरक्षा कवच दिलं होतं. त्यामुळे पाकिस्तानी हवाई हद्दीतला प्रवास राजकीयदृष्ट्या सुरक्षित मानला जातो आहे.
पेझेश्कियान यांच्या विमानाला असलेल्या धोक्याचा अंदाज याआधीच्या काही संशयास्पद घटनांवरून येतो. एप्रिलमध्ये एका इराणी वाटाघाटी शिष्टमंडळाने अमेरिका-इराण युद्धविराम चर्चेनंतर इस्लामाबादहून तेहरानला परतताना सुरक्षेचा धोका असल्याचा इशारा मिळाल्यावर शेवटच्या क्षणी आपला हवाई मार्ग बदलला होता.
तसंच १ सप्टेंबर २०२६ रोजी किर्गिझस्तानमधल्या बिश्केकहून एससीओ शिखर परिषद संपवून तेहरानला परतताना पेझेश्कियान यांचं विमान थेट तेहरानला न जाता उत्तर इराणमधल्या रश्तला आपत्कालीन स्थितीत उतरवण्यात आलं होतं. तिथे काही तास घालवल्यावर विमान तेहरानला पोहोचलं आणि त्याच रात्री पूर्व तेहरानमध्ये इराणची हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय होऊन मोठे स्फोट झाले होते. या घटनांमुळे इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या विमानाला थेट लक्ष्य केलं जाण्याची भीती आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त केली जात आहे.
इराणचं विमान भारतीय हवाई हद्दीत आल्यावर सुरक्षेची सगळी सूत्रं भारतीय हवाई दल आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या हातात येतील. नवी दिल्लीतल्या ब्रिक्स परिषदेसाठी आधीच खूप मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस, केंद्रीय निमलष्करी दलाच्या २०० कंपन्या आणि २५,००० ते ३०,००० सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय १०० हून जास्त एनएसजी कमांडो, स्वॅट पथकं, स्नायपर्स आणि घातपातविरोधी पथकं दिवसरात्र पहारा देत आहेत.
हवाई सुरक्षेचा विचार करता, दिल्लीच्या आकाशात ड्रोन, पॅराग्लायडर आणि इतर सगळ्या प्रकारच्या मानवरहित उड्डाणांवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. महत्त्वाच्या इमारतींच्या छतांवर स्नायपर्स आणि ड्रोनविरोधी यंत्रणा तयार ठेवण्यात आल्या आहेत. पेझेश्कियान यांच्या विमानाचा भारतीय हवाई हद्दीतला प्रवेशमार्ग, उडण्याची उंची आणि नेमकी वेळ सुरक्षेच्या कारणांमुळे गुप्त ठेवण्यात आली आहे.