तरुणांमधला भावनिक तणाव लपवण्याकडेच कल, मदत घेणारे फक्त 9.2%: सर्वेक्षण
एमपॉवरच्या सर्वेक्षणात भारतातील १८ ते २५ वयोगटातील तरुणांच्या मानसिक तणावाबाबतचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
मानसिक आरोग्याबद्दल आता आधीपेक्षा जास्त बोलले जात असले तरी प्रत्यक्षात तरुण पिढी अजूनही स्वतःचा तणाव एकट्याने पचवते, असे एका नव्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टअंतर्गत काम करणाऱ्या मानसिक आरोग्य सेवा पुरवठादार एमपॉवरने हे सर्वेक्षण केले असून त्याचे शीर्षक 'अनपॅक युअर इमोशनल बॅगेज: अ कॉल टू अॅक्शन फॉर यंग इंडियन्स टू सीक हेल्प ड्युरिंग इमोशनल डिस्ट्रेस' असे आहे.
या सर्वेक्षणासाठी मुंबई, पुणे, दिल्ली एनसीआर, बेंगळुरू, कोलकाता, अहमदाबाद, गोवा, हैदराबाद, चेन्नई आणि जयपूर अशा दहा शहरांमधल्या १८ ते २५ वयोगटातल्या तरुणांशी बोलणी झाली. तरुणांना नेमका कसा भावनिक ताण येतो, ते त्याला कसे सामोरे जातात आणि आजूबाजूचे लोक त्यांच्या त्रासाला कशी प्रतिक्रिया देतात, याचा शोध या सर्वेक्षणातून घेण्यात आला. मानसिक आरोग्याबद्दलची जागरूकता आणि प्रत्यक्षात मदत मागण्याची तयारी यांच्यातली मोठी दरी यातून स्पष्ट दिसते.
सर्वेक्षणानुसार भारतातील ४९.५ टक्के तरुण आपल्या मनातला ताण कोणाला सांगतच नाहीत, ते स्वतःच त्याच्याशी झगडत राहतात. दुसरीकडे, प्रोफेशनल मदत घेणाऱ्यांचे प्रमाण अवघे ९.२ टक्के इतकेच आहे. भावना लपवण्याची ही सवय रोजच्या वागण्यातही दिसते. सर्वेक्षणातल्या ४०.९ टक्के तरुणांनी सांगितले की ते स्वतः ठीक नसतानाही इतरांना 'मी ठीक आहे' असे सांगतात. अनेकांनी भावनांविषयीची चर्चाच टाळल्याचे किंवा जे काही सुरू आहे त्यापासून लक्ष हटवण्यासाठी स्वतःला सतत कामात गुंतवून ठेवल्याचे कबूल केले.
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या निमित्ताने बोलताना एमपॉवरच्या संस्थापक अध्यक्षा नीरजा बिर्ला म्हणाल्या, "आम्ही ज्या तरुणांशी बोललो त्यापैकी चाळीस टक्क्यांना फक्त 'प्रबळ राहा' असा सल्ला मिळाला होता. फक्त नऊ टक्के तरुणांना प्रोफेशनलची मदत मिळू शकली. या दोन आकड्यांच्या मधल्या पोकळीत कुठेतरी आपण त्यांना समजून घेण्यात कमी पडतोय. आपण संकट येण्याची वाटच पाहत राहतो. यावर उपाय म्हणजे शाळेपासूनच हे ओळखायला सुरुवात करणे, जेणेकरून शांत राहणे हा तरुणांसाठी परिस्थितीशी जुळवून घेण्याचा एकमेव मार्ग ठरणार नाही."
तरुण जेव्हा आपल्या भावना व्यक्त करतात, तेव्हा बहुतेकदा त्यांना दुर्लक्ष करणाऱ्या प्रतिक्रिया मिळतात, हेही सर्वेक्षणातून पुढे आले. 'मजबूत राहा' असे ऐकवणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ४०.४ टक्के आहे. यासोबतच तरुणांना 'तू जास्त विचार करतोयस' असे सांगितले जाते किंवा 'कामावर, अभ्यासावर लक्ष दे' असा सल्ला दिला जातो. कोणताही पूर्वग्रह न ठेवता कोणीतरी नुसते ऐकून घेतले आणि पाठिंबा दिला, असे सांगणारे फक्त १३.६ टक्के होते.
बाल, किशोरवयीन आणि कौटुंबिक मानसोपचारतज्ज्ञ तसेच एमपॉवरचे चीफ मेडिकल अॅडवायजर डॉ. झिरक मार्कर यांनी सांगितले की, मानसिक आरोग्य म्हणजे केवळ नैराश्य किंवा चिंतेसारखे क्लिनिकल निदान नाही, तर ती जगण्याची एक पद्धत आहे. आपण आपल्या मनातले विचार कसे हाताळतो, नाती कशी जपतो आणि भावनिक वेदनेला वाट कशी करून देतो, यातून ती दिसते. सतत 'मजबूत राहा', 'कामावर लक्ष दे' किंवा 'जास्त विचार करणे थांबव' असे ऐकवले गेल्याने तरुणांच्या वेदनेकडे दुर्लक्ष होते. त्रास लपवणे आणि भावना दाबून ठेवणे यातून मनात धोकादायक तणाव तयार होतो, जो गंभीर प्रकरणांत तीव्र नैराश्यापर्यंत आणि आत्महत्येपर्यंतही नेऊ शकतो, असे डॉ. मार्कर म्हणाले. त्यांच्या मते खरा उपाय म्हणजे वरवरचे सल्ले देण्याऐवजी सगळ्या इयत्तांच्या शालेय अभ्यासक्रमात मानसिक आरोग्य शिक्षणाचा समावेश करणे.
तणाव कसा निर्माण होतो यात लिंगभेदही स्पष्ट दिसतो. महिलांमध्ये आतल्या आत सुरू राहणारा ताण जास्त दिसतो, यात सतत अतिविचार करणे (६० टक्के महिला), स्वतःबद्दल शंका (५६ टक्के) आणि बॉडी इमेजची चिंता (६९ टक्के) यांचा समावेश आहे. पुरुषांमध्ये बाहेरून येणारा ताण जास्त दिसतो, ज्यात कामाशी संबंधित ताण (५७ टक्के पुरुष) आणि आर्थिक असुरक्षितता (५४ टक्के) यांचा समावेश होतो. दुसरी व्यक्ती सांगेपर्यंत आपल्या मनात काहीतरी बिनसलंय हे लक्षातच न येणाऱ्या प्रतिसादकर्त्यांपैकी ६० टक्के पुरुष होते.
भावनिक त्रास रोजच्या जगण्यात कसा दिसतो, हेही सर्वेक्षणातून पुढे आले. ४७ टक्के तरुणांनी लगेच राग येणे किंवा चिडचिड होणे सांगितले, ३६.७ टक्क्यांनी लक्ष केंद्रित करण्यात किंवा आनंद घेण्यात अडचण असल्याचे सांगितले, तर ३१.३ टक्क्यांनी रोजच्या कामावर किंवा दिनचर्येवर याचा परिणाम होत असल्याचे नमूद केले.
या सर्वेक्षणाचा निष्कर्ष स्पष्ट आहे, केवळ जागरूकता वाढवून आता भागणार नाही. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या निमित्ताने, नुसती चर्चा करण्याऐवजी तरुणांना पाऊल उचलणे सुरक्षित वाटेल असे वातावरण तयार करण्यावर लक्ष द्यायला हवे. आत्महत्या रोखण्याचे काम संकट उभे राहण्याच्या खूप आधीपासून सुरू होते, ते तरुणांना गप्प राहून त्रास सहन करायला भाग पाडणाऱ्या कलंक, पूर्वग्रह आणि दुर्लक्ष करणाऱ्या प्रतिक्रिया मोडून काढण्यापासून सुरू होते. वरवरच्या सल्ल्यांऐवजी सक्रिय आणि पूर्वग्रहरहित पाठिंबा दिल्यास जागरूकता आणि प्रत्यक्ष मदत यांच्यातली दरी कमी करता येईल.