गुरुवार, 17 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
04:23 IST

अति गरम चहा-कॉफीच्या सवयीमुळे अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका, तज्ज्ञांचा इशारा

वाफाळता चहा किंवा कॉफी सतत अति गरम पिण्याची सवय अन्ननलिकेला इजा पोहोचवून कर्करोगाचा धोका वाढवू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले.

अति गरम चहा-कॉफीच्या सवयीमुळे अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका, तज्ज्ञांचा इशारा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

सकाळी उठल्यावर गरमागरम चहा किंवा कॉफीचा कप हातात आल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही, असे बहुतेक घरांमध्ये चित्र असते. थकवा दूर करण्यासाठी, कामाच्या गडबडीत जरा विसावा घेण्यासाठी किंवा मित्रमंडळींसोबत गप्पा मारताना हा कप जणू रोजच्या जगण्याचा भाग बनला आहे. पण 'जितका गरम तितका चांगला' असं मानून सतत उकळता चहा-कॉफी घेण्याची सवय आरोग्यासाठी उलटी पडू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

65 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाचे पेय वारंवार घशाखाली उतरवल्यास अन्ननलिकेच्या आतील आवरणाला इजा होते आणि पुढे जाऊन याच सवयीमुळे अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अखत्यारीतील IARC या संस्थेने 65 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाच्या अतिउष्ण पेयांना "माणसांमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता असलेला घटक" (probably carcinogenic) या गटात टाकले आहे. याचा सरळ अर्थ चहा किंवा कॉफीमुळे थेट कॅन्सर होतो असा नाही, पण सतत आणि खूप गरम पेय पिण्याने तोंड, घसा आणि अन्ननलिकेच्या आतल्या भागाला उष्णतेमुळे इजा होते आणि त्यातून धोका वाढतो.

ओन्कोलाईफ कॅन्सर सेंटर, तळेगाव-दाभाडे येथील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विवेक बांडे यांनी सांगितले, की खूप गरम पेय प्यायल्याने अन्ननलिकेच्या आतल्या पेशींवर वारंवार उष्णतेचा ताण येतो आणि सूक्ष्म इजा होते. ही सवय वर्षानुवर्षं चालू राहिली तर अन्ननलिकेच्या कर्करोगाची शक्यता वाढते. त्यामुळे पेय जरा निवाळल्यावरच पिणे हा साधा पण महत्त्वाचा उपाय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

अन्ननलिकेच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे बऱ्याचदा दुर्लक्षित राहतात. अन्न गिळताना त्रास होणे, छातीत जळजळ किंवा वेदना, घशात अन्न अडकल्यासारखे वाटणे, आवाजात फरक पडणे, अचानक वजन घटणे आणि बराच काळ खोकला येत राहणे ही लक्षणे सतत जाणवत असतील तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

अपोलो स्पेक्ट्रा, पुणे येथील हेड अँड नेक सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राम पाटील यांच्या मते, गिळताना त्रास होणे किंवा घशात अन्न अडकल्यासारखे सतत वाटणे या गोष्टींना केवळ अॅसिडिटी समजून सोडून देऊ नये. धूम्रपान आणि दारू टाळणे, संतुलित आहार घेणे, नियमित तपासणी करून घेणे आणि अतिउष्ण पेये टाळणे या सवयींमुळे धोका कमी करता येतो, असे त्यांनी सांगितले.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार चहा-कॉफीची सवय असणाऱ्यांनी उकळते पेय लगेच न पिता काही मिनिटे थांबावे. साधारण 50 ते 60 अंश सेल्सिअस तापमान तुलनेने सुरक्षित मानले जाते. सोबतच पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे आणि धूम्रपान-मद्यपान टाळणे या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे.

अन्ननलिकेच्या कर्करोगाला केवळ अतिउष्ण पेयेच कारणीभूत ठरतात असे नाही. तंबाखूचे सेवन, दारू, लठ्ठपणा, आहारातील काही घटक आणि इतर वैद्यकीय कारणेही यात भर घालू शकतात. त्यामुळे चहा-कॉफी पूर्ण बंद करण्याऐवजी ती अति गरम असताना पिणे टाळावे आणि शरीरात दिसणाऱ्या असामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ