अब्जाधीशाचा दावा: सोने दहा पट वाढून 10 ग्रॅमला 15 लाखांवर जाऊ शकते
इलेक्ट्रम कंपनीचे अध्यक्ष थॉमस कपलान यांच्या भाकितानं सोन्याच्या बाजारात नवी चर्चा सुरू झाली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावात होणाऱ्या घसरणीमुळे गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. सोन्याचा तेजीचा काळ संपला का, असा प्रश्न विचारला जात असतानाच जागतिक अब्जाधीश आणि इलेक्ट्रम (Electrum) कंपनीचे अध्यक्ष थॉमस कपलान यांनी केलेल्या एका विधानानं बाजारात नवी चर्चा सुरू झाली आहे. कपलान यांच्या म्हणण्यानुसार सोन्याचा हा प्रवास इथेच थांबलेला नाही, तर दीर्घकाळात सोने सध्याच्या पातळीपेक्षा तब्बल 10 पटीने वाढू शकते.
कपलान यांनी केलेल्या दीर्घकालीन विश्लेषणानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आगामी काळात प्रति औंस 30,000, 40,000 ते 50,000 डॉलर या उच्चांकी पातळीवर पोहोचू शकते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोने साधारण 4,600 डॉलर प्रति औंस या भावानं विकलं जातंय, तर भारतीय बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव दीड लाख रुपयांच्या आसपास आहे.
याचं भारतीय गणित असं आहे - जर आंतरराष्ट्रीय भाव 50,000 डॉलरपर्यंत पोहोचला आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 95 रुपये धरला, तर भारतीय बाजारात 10 ग्रॅम सोने थेट 15 लाख रुपयांवर जाऊन पोहोचेल.
मात्र या मोठ्या तेजीसाठी कपलान यांनी कोणतीही ठराविक कालमर्यादा किंवा तारीख दिलेली नाही. अल्पमुदतीत सोन्यात आणखी अस्थिरता किंवा घसरण दिसू शकते, पण मध्यम आणि दीर्घ मुदतीत सोनं-चांदी मोठी उसळी घेणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
सध्याच्या घसरणीमुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांना धीर देताना कपलान यांनी 1987 सालच्या शेअर बाजारातील पडझडीचं उदाहरण दिलं. त्या वर्षी 'ब्लॅक मंडे'च्या दिवशी अमेरिकी बाजारात जवळपास 36% इतकी मोठी घसरण झाली होती. त्या वेळी ती मंदी खूप भयंकर वाटली होती, पण आजच्या दीर्घकालीन आकडेवारीत ती एका लहान ठिपक्यासारखी दिसते, असं कपलान यांचं म्हणणं आहे.
कपलान यांच्या मते सोनं-चांदीमधली सध्याची तीव्र घसरण ही भीतीचं कारण नाही, तर एक ऐतिहासिक खरेदीची संधी आहे. 1987 मधली घबराट जशी नंतर सुवर्णकाळ ठरली, तशीच ही वेळ असल्याचं ते सांगतात. पण या प्रवासात गुंतवणूकदारांना मोठ्या चढ-उतारांचा सामना करावा लागेल, असंही त्यांनी नमूद केलं.
ही दूरगामी 15 लाखांची पातळी गाठली जाणं हे पूर्णपणे काही आर्थिक घटकांवर अवलंबून असेल. यामध्ये जगभरातल्या विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून वाढत असलेली सोन्याची खरेदी, युद्ध-व्यापार तणाव आणि जागतिक राजकारणातली अस्थिरता, अमेरिकेच्या फेडरल बँकेसह इतर बँकांचं व्याजदर धोरण आणि वाढती महागाई, तसंच डॉलरच्या तुलनेत रुपयाचं होणारं अवमूल्यन या घटकांचा समावेश आहे.
थॉमस कपलान यांचं हे भाकित अल्पमुदतीच्या ट्रेडिंगसाठीचं उद्दिष्ट नाही, तर एक मोठा दृष्टिकोन आहे. पोर्टफोलिओमध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं दीर्घ मुदतीसाठी घेणं फायद्याचं ठरतं. घसरणीच्या प्रत्येक टप्प्यावर टप्प्याटप्प्यानं खरेदी करणं, म्हणजेच एसआयपी पद्धतीनं गुंतवणूक करणं, हे देखील फायदेशीर ठरू शकतं.