Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या चाहत्यांचा मोठा पुढाकार; ८ राज्यांत ८२० कार्यक्रम, ३ लाख मुलींपर्यंत पोहोचवला
अल्लू अर्जुन फॅन असोसिएशनने HPV लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी देशभरात मोठी मोहीम राबवली.
अल्लू अर्जुन हा फक्त बॉक्स ऑफिसवर हिट सिनेमे देणारा अभिनेता नाही, तर त्याचा एक मोठा चाहतावर्गही देशभर पसरलेला आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याकडून मिळालेला सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेत, अल्लू अर्जुन फॅन असोसिएशन म्हणजेच AAFAच्या सदस्यांनी HPV लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. या चाहत्यांनी आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या पावलावर पाऊल ठेवत हा सामाजिक विषय हाती घेतला आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.
महाराष्ट्रासह देशातील एकूण आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या चाहत्यांनी तब्बल ८२० जनजागृती कार्यक्रम राबवले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून ३ लाखांहून जास्त मुलींपर्यंत HPV लसीकरणाचा संदेश पोहोचवण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कार्यक्रम आयोजित करणे आणि तितक्याच मोठ्या संख्येने मुलींपर्यंत हा संदेश पोहोचवणे, हे या मोहिमेचे मोठे यश मानले जात आहे.
ज्या आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे कार्यक्रम झाले, त्यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, ओडिशा आणि अंदमान-निकोबार बेटांचा समावेश आहे. AAFAने हे उपक्रम अगदी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या मोहिमेतून ३ लाखांहून जास्त मुलींना HPV लसीकरण नेमकं का महत्त्वाचं आहे, हे समजावून सांगण्यात आलं. HPV लसीकरणाबाबत बरोबर माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यातून आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणं, हाच या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.
याआधीच AAFAने HPV लसीकरण जनजागृती कार्यक्रमाची घोषणा केली होती आणि आता ही मोहीम अजून व्यापक होत चालली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून सोलापूर टीमने सोलापूर जिल्ह्यातल्या निळकंठेश्वर हायस्कूलमध्ये HPV लसीकरण जनजागृती कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमात शाळेतल्या मुलांना HPV लसीकरणाचं महत्त्व काय आहे, त्याचे प्रतिबंधात्मक फायदे कोणते आणि पुढच्या पिढीला HPV-संबंधित आजारांपासून वाचवण्यात लसीकरणाची भूमिका काय, याबद्दल माहिती देण्यात आली. शाळेतल्या मुलांना समजेल अशा भाषेत ही माहिती देण्यात आली, जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा संदेश नीट पोहोचेल.
या संपूर्ण मोहिमेमागचा उद्देश म्हणजे HPV लसीकरणाबाबत समाजात योग्य ती चर्चा घडवून आणणे. त्याचबरोबर सर्व्हायकल कॅन्सरपासून बचाव कसा करायचा आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक उपाय कोणते, याबाबत जास्तीत जास्त लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचाही AAFAचा प्रयत्न आहे. या विषयावर उघडपणे बोललं जावं आणि योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, हा या उपक्रमामागचा मूळ हेतू आहे.
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी आपली एकत्रित ताकद आणि प्रभाव एका सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यासाठी वापरला, यामुळे हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याची चाहत्यांची भावना या मोहिमेतून स्पष्टपणे दिसून येते.