मोठी बातमी! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ऑनलाईन
अकोला जिल्ह्यात शिधापत्रिकांचे शंभर टक्के डिजीटलायझेशन पूर्ण, ई-केवायसी न केल्यास रेशनचा लाभ बंद होण्याचा इशारा
धान्य वितरण व्यवस्थेतील गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी पुरवठा विभागाने शिधापत्रिकांचे डिजीटलायझेशन हाती घेतले असून, अकोला जिल्ह्यात हे काम आता पूर्णत्वास गेले आहे. ऑगस्ट २०२६ अखेरपर्यंत जिल्ह्यात एकूण ४ लाख ६५ हजार ५५१ शिधापत्रिकाधारक नोंदले गेले आहेत. यापैकी १ लाख ३८ हजार ९४७ लाभार्थ्यांना ई-शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत. नव्याने काढलेल्या शिधापत्रिकांबरोबरच जुन्या शिधापत्रिकाही ई-शिधापत्रिकेत रूपांतरित करण्यात आल्या आहेत.
राज्यभरात कागदी शिधापत्रिकेऐवजी ई-शिधापत्रिका ही सुविधा सुरू करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी अकोला जिल्ह्यातही केली जात आहे. जिल्ह्यातील शिधापत्रिकांचे शंभर टक्के डिजीटलायझेशन पूर्ण झाल्यामुळे आता भौतिक कार्डाऐवजी ई-शिधापत्रिका आणि ई-केवायसी प्रक्रियेला प्राधान्य दिले जात आहे. शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांची ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे, म्हणजेच शिधापत्रिकेत नाव असलेल्या प्रत्येक कुटुंबसदस्याला स्वतंत्रपणे ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
निर्धारित मुदतीत ई-केवायसी पूर्ण न केल्यास रेशनचा लाभ बंद होऊ शकतो किंवा संबंधित सदस्याचे नाव शिधापत्रिकेतून वगळले जाऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. 'मिशन सुधार' या मोहिमेअंतर्गत बनावट आणि अपात्र शिधापत्रिकाधारकांची नावे वगळण्यासाठीही कारवाई सुरू आहे. नव्या भौतिक शिधापत्रिकांची छपाई आता बंद करण्यात आली असून, त्याऐवजी डिजीटल ई-शिधापत्रिकेचाच वापर केला जात आहे. जिल्ह्यातील ९९ टक्क्यांहून अधिक शिधापत्रिका आधारशी जोडण्यात आल्या आहेत.
आर्थिक उत्पन्न आणि निकषांनुसार शिधापत्रिकांचे प्रामुख्याने चार ते पाच प्रकार आहेत. यामध्ये पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, पांढरे म्हणजेच शुभ्र रेशन कार्ड, अंत्योदय अन्न योजना कार्ड आणि पाचवे प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड यांचा समावेश होतो. यातील पिवळे रेशन कार्ड दारिद्र्यरेषेखालील म्हणजेच अत्यंत कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी असते. या वर्गीकरणामुळे कुटुंबाच्या आर्थिक स्थितीनुसार त्यांना मिळणारे धान्य आणि इतर लाभ ठरतात.
गणपती आणि नवरात्री हे सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असून, या सणासुदीच्या काळात रेशन दुकानांतून स्वस्त धान्य दिले जाते. याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेला आनंदाचा शिधाही रेशनकार्डधारकांना दिला जातो. त्यासाठी आपले रेशनकार्ड सुरू असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक नागरिकांना आपले रेशनकार्ड सुरू आहे की बंद पडले आहे, याची माहितीच नसते. त्यामुळे रेशन घेताना अनेकांचे कार्ड होल्डवर टाकले जाते. आता अन्न पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की, असे बंद पडलेले कार्ड पुन्हा सुरू करायचे असल्यास ई-केवायसी करणे आवश्यक ठरणार आहे.