Abhishek Sharma ने मार्केट जाम केलंय! अफगाणिस्तानविरुद्ध वादळी खेळी अन् ICC रँकिंगमध्ये मोठी झेप
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सिरिजमध्ये भारताच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सिरिजमध्ये भारताच्या डावखुऱ्या फलंदाज अभिषेक शर्माने वादळी खेळी करत सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं आहे. पहिल्या दोन सामन्यांमधल्या भन्नाट फलंदाजीच्या जोरावर त्याने आयसीसीच्या ताज्या टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर उसळी घेतली आहे. या सिरिजमध्ये भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध सिरिज जिंकली असून, उद्या या सिरिजमधला शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे अभिषेक शर्माच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
पहिल्या टी-20 सामन्यात 82 रन्स आणि दुसऱ्या सामन्यात 39 रन्सची झंझावाती खेळी करत अभिषेकने रँकिंगमध्ये एका स्थानाची सुधारणा केली. त्याने पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला मागे टाकत दुसरा नंबर पटकावला. भारताचा फलंदाज ईशान किशन अजूनही टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. सध्या अव्वल असलेला ईशान किशन आणि दुसऱ्या क्रमांकावरचा अभिषेक शर्मा यांच्यात 51 रेटिंग पॉईंट्सचं अंतर आहे.
दुसऱ्या टी-20 सामन्यात अवघ्या 22 चेंडूंत 57 रन्सची स्फोटक खेळी करणाऱ्या संजू सॅमसनलाही याचा फायदा झाला. चार स्थानांची उसळी घेत तो आता 30 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. या सिरिजमध्ये भारतीय गोलंदाजांनीही जबरदस्त कामगिरी केली असून त्यांनी क्रमवारीत मोठी झेप घेत आपापली स्थानं भक्कम केली आहेत.
गुगली आणि फिरकीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणणारा भारतीय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती दोन स्थानांची सुधारणा करत जागतिक क्रमवारीत थेट पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तब्बल सात स्थानांची मोठी झेप घेत पुन्हा एकदा टॉप-10 मध्ये जागा मिळवली असून तो आता 10 व्या स्थानावर पोहोचला आहे.
दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर मालिकेतल्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 20 षटकांत 8 गडी गमावत 159 धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी 160 धावांचं लक्ष्य ठेवलं. हा पाठलाग करताना भारताने फक्त 14.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून दुसराही सामना जिंकला आणि ही मालिका आपल्या नावावर केली. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या दोघांनीही त्या दिवशी तुफान खेळी करत पॉवरप्लेमध्ये 82 धावा कुटल्या.
आता या सिरिजमधला तिसरा आणि शेवटचा सामना 17 सप्टेंबर रोजी दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याकडेही सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे.