आयफोनच्या किमतीत फिरता येतील बाली, मालदीव, दुबईसह ५ सुंदर देश
आयफोन Duo च्या किमतीएवढ्या म्हणजे साधारण ३ लाख रुपयांच्या बजेटमध्ये कुटुंबासोबत परदेश ट्रिप करता येईल असे ५ पर्याय.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
आयफोन खरेदी करायची क्रेझ सध्या अनेकांना लागलेली दिसते. नवा आयफोन बाजारात आला की स्टोअरसमोर रांगा लागतात आणि काही तासांतच स्टॉक संपून जातो. पण याच पैशांत तुम्ही जगातल्या काही सुंदर देशांची सहल करू शकता हे फार कमी जणांच्या लक्षात येते. आयफोनचा येऊ घातलेला स्मार्टफोन iPhone Duo साधारण ३ लाख रुपयांना लाँच झाला आहे. एवढ्याच बजेटमध्ये कुटुंबासोबत इंटरनॅशनल ट्रिप पूर्ण होऊ शकते. आयुष्यात एकदा तरी परदेशात फिरायला जावं अशी इच्छा प्रत्येकाची असते, त्यामुळे फोनवर पैसे उडवण्याऐवजी हाच पैसा सहलीसाठी वापरता येईल. यासाठी कोणकोणते देश योग्य ठरतील ते पाहूया.
फिरण्यासाठी बाली हा एक लोकप्रिय आणि सुंदर पर्याय आहे. कमी बजेटमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात राहायचं असेल तर बाली उत्तम ठरतो. ३ लाखांच्या बजेटमध्ये दोन जण इथे आठवडाभराची ट्रिप आरामात प्लॅन करू शकतात, ज्यात फ्लाईट तिकीट, प्रायव्हेट व्हिला आणि राहण्या-खाण्याचा खर्चही बसतो. उबुद, तेगल्लालंग राईस टेरेसेस, उलुवाटू आणि नुसा पेनिडा ही ठिकाणं इथे फिरण्यासाठी सर्वोत्तम मानली जातात. समुद्रकिनारा, नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण हा इथला मुख्य अनुभव असतो.
भारतीय पर्यटक इंटरनॅशनल ट्रिपसाठी बऱ्याचदा मालदीवची निवड करतात. इथे समुद्रकिनारे, लक्झरी रिसॉर्ट्स आणि व्हिला वाजवी दरात मिळतात. भारतीयांना इथे व्हिसा फ्री एंट्री मिळत असल्याने प्रवास आणखी सोपा होतो. ४-स्टार हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये राहायचं ठरवलं तर ३ लाख रुपयांत ४ ते ५ दिवसांची आलिशान ट्रिप सहज पूर्ण होते.
दुबईसाठीही ३ लाखांचं बजेट पुरेसं आहे. इतक्या पैशांत दुबईत ५ ते ६ दिवस आरामात राहता येतं. बुर्ज खलिफा, पाम जुमेराह, दुबई मॉल आणि दुबई फाउंटन यांसारखी प्रसिद्ध ठिकाणं इथे पाहता येतात. सोबतच गोल्ड शॉपिंग, दुबईचा फेमस कुनाफा आणि जगभर लोकप्रिय असलेली दुबईची चॉकलेट्सही इथे चाखता येतात.
ग्रीसची आठवडाभराची ट्रिप देखील भारतातून ३ लाखांच्या बजेटमध्ये होऊ शकते. निळ्या-पांढऱ्या घरांसाठी ओळखला जाणारा हा युरोपियन देश आहे. अथेन्स, सँटोरिनी आणि मायकोनोस ही शहरं आणि बेटं पर्यटकांमध्ये खास लोकप्रिय आहेत, तसंच इथे अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळंही पाहता येतात.
मॉरीशस हाही ३ लाखांच्या बजेटमध्ये फिरण्यासाठी चांगला पर्याय ठरतो. इथे ५ ते ६ दिवसांची ट्रिप या बजेटमध्ये पूर्ण होते, ज्यात फ्लाईट, चांगलं हॉटेल आणि राहण्या-खाण्याचा खर्च समाविष्ट असतो. भारतीयांना इथे फ्री व्हिसा ऑन अरायव्हल मिळतं आणि त्याची वैधता ६० दिवसांची असते, त्यासाठी दूतावासात आधी जाण्याची किंवा वेगळा अर्ज भरण्याची गरज नसते. मॉरीशसला 'समुद्रावरचं नंदनवन' म्हटलं जातं. इथे हिंदूंची लोकसंख्या ५२ टक्के आहे आणि निळाशार समुद्र, पांढऱ्या वाळूचे किनारे व पर्वतरांगा यासाठी हे ठिकाण खास ओळखलं जातं.