सीआयएच्या नवीन कागदपत्रांमधून खुलासा; ९/११ आधीच बिन लादेनच्या यादीत भारताचेही नाव होते
अमेरिकेतील ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्यांना २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सीआयएने ७१ गोपनीय अहवाल खुले केले आहेत, त्यात १९९८ सालीच भारताचा उल्लेख अल-कायदाच्या संभाव्य निशाण्यांमध्ये सापडतो.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अल-कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेन याने अमेरिकेवरील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यांच्या आधीपासूनच भारताला आपल्या हिंसक योजनांच्या रडारवर ठेवले होते, हे अमेरिकेच्या गुप्तचर संस्था सीआयएने नुकत्याच खुल्या केलेल्या कागदपत्रांतून समोर आले आहे. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत झालेल्या भीषण हल्ल्यांच्या २५ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सीआयएने ७१ गोपनीय अहवाल सार्वजनिक केले. यातून तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना दिली जात असलेली संवेदनशील माहिती उघड झाली असून, बिन लादेनच्या दहशतवादी जाळ्याची जागतिक व्याप्ती किती मोठी होती हे स्पष्ट होते.
यातील एक महत्त्वाचा दस्तऐवज २८ ऑगस्ट १९९८ रोजी तयार करण्यात आला होता. "Bin Laden's Terrorist Network Remains a Threat" (बिन लादेनचे दहशतवादी जाळे अजूनही धोकादायक आहे) असे शीर्षक असलेला हा अहवाल तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या दैनंदिन गुप्तचर ब्रीफिंगचा भाग होता. यात सीआयएने स्पष्ट इशारा दिला होता की, बिन लादेनचे नेटवर्क केवळ मध्यपूर्वेपुरते मर्यादित नाही, तर भारत आणि पाकिस्तानसह जगातील अनेक देशांमध्ये मोठ्या हल्ल्यांची आखणी सुरू आहे.
हा अहवाल तयार होण्याच्या अवघ्या तीन आठवड्यांआधी, म्हणजे ७ ऑगस्ट १९९८ रोजी, आफ्रिकेतील नैरोबी (केनिया) आणि दार-ए-सलाम (टांझानिया) येथील अमेरिकन दूतावासांवर अल-कायदाने भीषण बॉम्बस्फोट घडवले होते. या हल्ल्यांत २२४ निष्पाप लोक मरण पावले आणि शेकडो जण जखमी झाले. यानंतर अमेरिकेने बिन लादेनच्या अफगाणिस्तानातील तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले, पण त्यातून लादेन आणि त्याचे मुख्य सहकारी बचावले.
सीआयएच्या अहवालानुसार, या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतरही अल-कायदाचे संपर्क जाळे आणि प्रशिक्षण शिबिरे पुन्हा पूर्ववत सुरू झाली होती. लादेनने भारत, पाकिस्तान, इजिप्त, कुवेत, सौदी अरेबिया, येमेन, युगांडा आणि नायजेरिया या देशांना आपल्या दहशतवादी योजनांचे संभाव्य केंद्र म्हणून चिन्हांकित केले होते. अहवालात भारतावर होणाऱ्या हल्ल्याची नेमकी जागा किंवा वेळ नोंदवलेली नाही, पण ९/११ च्या तब्बल तीन वर्षे आधीच भारत लादेनच्या जागतिक हिंसक अजेंड्याचा भाग बनला होता, हे यातून स्पष्ट होते.
सीआयएच्या मूल्यांकनानुसार बिन लादेनचे समर्थक आणि सहकाऱ्यांचे जाळे किमान ६० देशांमध्ये पसरले होते. अमेरिकन अधिकाऱ्यांनी अल्बानियातील तिराना आणि अझरबैझानमधील बाकू येथे हल्ल्याची तयारी करणाऱ्या बिन लादेनच्या हस्तकांना अटक करण्यासाठी स्थानिक प्रशासनाला मदत केली होती, असाही खुलासा या अहवालात आहे. उत्तर अमेरिका, युरोप आणि पूर्व आशियातही अल-कायदाची पायाभूत रचना मजबूत असल्यामुळे हे नेटवर्क कुठेही आणि कधीही अमेरिकन व पाश्चात्य हितसंबंधांवर हल्ला करू शकते, अशी भीती सीआयएने त्यावेळी व्यक्त केली होती.
या कागदपत्रांमुळे ९/११ पूर्वी अमेरिकन गुप्तचर संस्थांकडे नेमकी काय माहिती उपलब्ध होती, याचे महत्त्व पुन्हा समोर आले आहे. ९/११ च्या तीन वर्षे आधीच अमेरिकेला लादेनच्या मनसुब्यांची कल्पना होती, पण या इशाऱ्यांचे गांभीर्य वेळेवर लक्षात न आल्याने किंवा समन्वयाच्या अभावामुळे ११ सप्टेंबर २००१ चा भीषण हल्ला रोखता आला नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. भारतासाठी हा खुलासा महत्त्वाचा मानला जातो, कारण १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धातच भारताला अल-कायदासारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेकडून असलेला धोका अमेरिकन कागदपत्रांत नोंदवला गेला होता.