दहशतवाद्यांना आश्रय देणारी यंत्रणा उखडून टाका; संयुक्त राष्ट्रांत भारताचा पाकिस्तानवर हल्लाबोल
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने अल-कायदा, लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांना मानवतेचे राक्षस म्हणत पाकिस्तानातील त्यांच्या आश्रयस्थानांचा पर्दाफाश केला.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (UNSC) दहशतवादाच्या मुद्द्यावरून भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पुन्हा एकदा घेरले आहे. जगभरात उच्छाद मांडणाऱ्या अल-कायदा, लश्कर-ए-तोयबा (LeT) आणि जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनांचा उल्लेख करत भारताने त्यांना थेट "मानवतेचे राक्षस" असे संबोधले. केवळ दहशतवाद्यांना संपवून भागणार नाही, तर त्यांना सुरक्षित आश्रय देणारी आणि त्यांची पाठराखण करणारी संपूर्ण यंत्रणाच उखडून टाकावी लागेल, असे ठाम आवाहन भारताने जागतिक समुदायाला केले.
संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत पर्वथनेनी हरीश यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीत बोलताना ९/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली. ९/११ नंतर जगाने दहशतवादाविरोधात एकत्र येऊन लढा दिला असला, तरी अल-कायदासारख्या संघटनांचे जाळे केवळ अफगाणिस्तानच्या सीमांपुरते मर्यादित राहिले नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. अफगाणिस्तानच्या पलीकडे या दहशतवादी संघटनांनी जिथे आपले पाय भक्कम रोवले, तो भाग म्हणजे पाकिस्तान होता, जिथे तिथल्या राज्यकर्त्यांच्या आणि लष्कराच्या छत्रछायेखाली त्यांना आश्रय मिळाला, असा थेट रोख भारताने आपल्या भाषणातून दाखवला.
राजदूत पर्वथनेनी हरीश यांनी ९/११ च्या कटातील मुख्य सूत्रधारांचा आपल्या भाषणात खास उल्लेख केला. जगभरात दहशत माजवणारे हे गुन्हेगार कुठल्या दुर्गम डोंगरदऱ्यांत किंवा गुहांमध्ये लपलेले फरारी नव्हते, असे ते म्हणाले. ९/११ च्या हल्ल्यांचा मास्टरमाइंड आणि अल-कायदाप्रमुख ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानातील ॲबोटाबाद इथल्या लष्करी छावणीजवळच्या एका सुरक्षित, तटबंदी असलेल्या महालात राहत होता. अमेरिकेने 'ऑपरेशन नेपच्यून स्पीअर' राबवून तिथेच त्याचा खात्मा केला होता.
याशिवाय या कटाची रणनीती आखणारा खालिद शेख मोहम्मद पाकिस्तानातील एका नागरी भागातल्या खाजगी अपार्टमेंटमध्ये लपलेला आढळला होता. तर अपहरणकर्त्यांच्या गटात सामील होण्यासाठी व्हिसा नाकारला गेलेला आणि संपूर्ण मोहिमेचा समन्वय सांभाळणारा रमझी बिन अल-शिभ हादेखील पाकिस्तानातील शहरी वस्तीत मोकळेपणाने वावरत होता. या सगळ्या पुराव्यांवरून पाकिस्तानने जगाच्या डोळ्यांत धूळ फेकत या दहशतवाद्यांना आपल्या भूमीत कसे सुरक्षित ठेवले, हे स्पष्ट होते.
भारताने स्पष्ट शब्दांत सांगितले की, ज्या भागांत ९/११ च्या सूत्रधारांना वर्षानुवर्षे राजाश्रय मिळाला, त्याच प्रदेशातून आज लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संघटना आपले जाळे पसरवत आहेत. हे दहशतवादी आजही भारतासह जगभरात हिंसक कारवाया करण्यासाठी त्याच परिसंस्थेचा वापर करत आहेत. दहशतवादाला खतपाणी घालणारी आणि अशा रानटी प्रवृत्तींना पोसणारी ही संपूर्ण यंत्रणा मुळासकट उखडून टाकल्याशिवाय जगात खरी शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही, असे ठाम प्रतिपादन भारताने केले. भारताच्या या स्पष्ट आणि थेट भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानचा कपटीपणा आणि त्याने दहशतवादाला दिलेला पाठिंबा पुन्हा एकदा उघड झाला आहे.