'वेट्टुवम'ची झलक प्रदर्शित; पा. रंजीत यांच्या पॅन-इंडिया चित्रपटात प्राचीन युद्धकौशल्यांचा थरार
पा. रंजीत यांच्या पहिल्या पॅन-इंडिया चित्रपटाची, 'वेट्टुवम'ची, पहिली झलक आज प्रेक्षकांसमोर आली आहे.
पा. रंजीत यांच्या पहिल्या पॅन-इंडिया चित्रपटाबद्दल 'वेट्टुवम' या नावाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. 'द वर्ल्ड ऑफ वेट्टुवम'ची झलक दाखवण्याचं आश्वासन आधीच देण्यात आलं होतं आणि आता ही झलक प्रदर्शित करण्यात आली आहे.
चित्रपटात जमिनीवरील वर्चस्वासाठी वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये संघर्ष दाखवला जाणार आहे. या संघर्षाच्या रचनेसाठी प्राचीन भारतातील पारंपरिक युद्धकौशल्यांचा आधार घेतला असून, त्यासाठी सगळ्या कलाकारांनी वेगवेगळ्या मार्शल आर्ट्समध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेतलं आहे. जमिनीवरील वर्चस्वासाठी एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या या टोळ्यांच्या संघर्षालाच 'वेट्टुवम' म्हटलं जातं.
निर्मात्यांनी 'द वर्ल्ड ऑफ वेट्टुवम' सादर करताना एक खास व्हिडिओ प्रदर्शित केला. या व्हिडिओत हिंदी आवृत्तीसाठी पंकज त्रिपाठी यांनी आवाज दिला आहे, तर तमिळमध्ये पा. रंजीत, तेलुगूमध्ये राणा दग्गुबाती, कन्नडमध्ये किच्चा सुदीप आणि मल्याळममध्ये सौबिन शाहीर यांनी निवेदन केलं आहे. चित्रपटात भूतकाळातील घटनांचे परिणाम वर्तमानावर कसे उमटतात आणि त्याचा भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो, हे दाखवलं जाणार आहे. याच घटनांमुळे नैसर्गिक आपत्तींचं चक्र तयार होतं, ज्याचा मानवजातीच्या भविष्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
चित्रपटातून पारंपरिक खेळ मल्लखांबही मोठ्या पडद्यावर एका वेगळ्या आणि आधी कधी न पाहिलेल्या स्वरूपात दाखवला जाणार आहे. याशिवाय या पहिल्या झलकेत कलाकारांचे प्रभावी लूकही पाहायला मिळतात, त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
या चित्रपटात आर्या, व्ही. आर. दिनेश, शोभिता धुलिपाला, कलैयारसन, माइम गोपी, गुरु सोमसुंदरम, शबीर कल्लारक्कल, जॉन विजय, साई धीना, आनंद सामी, हरीश उत्तमन, लिझी, लिंगेश प्रेम कुमार, कविता भारती, अर्जुन, संथा कुमार, मेलडी, मनीषा, निम्मी, राफेल, विक्रम, नवीन आणि प्रकाश हे कलाकार दिसणार आहेत.
जी. व्ही. प्रकाश कुमार यांच्या संगीतामुळे चित्रपटाच्या विश्वात आणखी वेगळी रंगत आली आहे. 'कबाली', 'काला', 'सरपट्टा परंबरई' आणि 'थंगालन' यांसारखे गाजलेले चित्रपट दिग्दर्शित करणारे पा. रंजीत 'वेट्टुवम'च्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहेत, त्यामुळे हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर साकारला जाईल अशी अपेक्षा आहे.
पा. रंजीत यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला 'वेट्टुवम' हा चित्रपट तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये पॅन-इंडिया स्तरावर प्रदर्शित होणार आहे. एस. साई देवानंद, एस. साई व्यंकटेश्वरन आणि पा. रंजीत यांची निर्मिती असलेला हा चित्रपट Learn and Teach Production आणि Neelam Productions या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. 'वेट्टुवम' डिसेंबर २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.