35 किमी मायलेज आणि किंमत फक्त 3.69 लाखांपासून! दिवाळीत कार खरेदीचा विचार करताय? 10 लाखांच्या आत मिळतात या
10 लाख रुपयांच्या आत बजेट आणि उत्तम मायलेज देणाऱ्या गाड्यांची यादी, दिवाळीत नवी गाडी घेणाऱ्यांसाठी उपयुक्त.
दिवाळी अगदी जवळ आली आहे आणि या सणासुदीच्या काळात नवी गाडी घरी आणणे हे अनेकांचे स्वप्न असते. या आनंदाच्या पर्वात गाडी खरेदी करण्याचा विचार अनेक कुटुंबं करत असतात. पण सध्याच्या महागाईत गाडी घेताना बजेट आणि मायलेज या दोन्ही गोष्टींचा विचार करणे गरजेचे झाले आहे. खिशाला परवडणारी आणि त्याचबरोबर इंधनाची बचत करणारी गाडी निवडणे हे आजच्या काळात महत्त्वाचे ठरले आहे. ज्यांना 10 लाख रुपयांच्या आतल्या बजेटमध्ये चांगला मायलेज देणारी कार हवी आहे, त्यांच्यासाठी बाजारात सध्या बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
पहिल्यांदाच गाडी घेणाऱ्या आणि कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठी मारुती सुझुकी अल्टो के10 हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या गाडीच्या बेस व्हेरिएंटची किंमत 3.69 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती लिटरला जवळपास 24.8 किमीपर्यंत मायलेज देते. आकार लहान असल्यामुळे आणि मेंटेनन्सचा खर्चही कमी असल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांची ही पहिली निवड ठरते.
मायलेजच्या बाबतीत मारुती सुझुकी सिलेरियोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या कारच्या सीएनजी मॉडेलला ARAI प्रमाणित तब्बल 35.12 किमी प्रति किलोग्रॅम मायलेज मिळतो, तर पेट्रोल व्हेरिएंट लिटरला 26.6 किमी मायलेज देतो. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.69 लाख रुपये आहे. सीएनजी आणि पेट्रोल असे दोन्ही पर्याय उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना आपल्या गरजेनुसार निवड करता येते.
शहरी भागात आणि मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये मारुती सुझुकी वॅगनआरची क्रेझ कायम आहे. या कारची किंमत 4.98 लाख रुपयांपासून सुरू होते आणि कंपनीच्या दाव्यानुसार ती लिटरला 26.1 किमी मायलेज देते. केबिन मोठा आणि डिझाईन आरामदायक असल्यामुळे शहरातल्या तसेच लांबच्या प्रवासासाठी ही गाडी फायद्याची ठरते.
स्टाईल, कम्फर्ट आणि मायलेज या तिन्ही गोष्टींचा मेळ घालणारी मारुती सुझुकी स्विफ्ट आजही तरुणांची फेवरेट कार आहे. हिच्या VXi व्हेरिएंटची किंमत 5.84 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ही गाडी साधारण 23.2 किमी प्रति लिटर मायलेज देते. हॅचबॅक सेगमेंटमध्ये थोडा स्पोर्टी लूक हवा असणाऱ्यांसाठी हा चांगला ऑप्शन आहे.
हॅचबॅकऐवजी कॉम्पॅक्ट एसयुव्ही हवी असणाऱ्यांसाठी ह्युंदाई एक्सटर आणि टाटा पंच हे दोन पर्याय आहेत. ह्युंदाई एक्सटरची किंमत 5.79 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 19 किमी प्रति लिटर मायलेज देते, तर टाटा पंचची किंमत 5.75 लाख रुपयांपासून सुरू होते आणि तिचा मायलेज 18 किमी प्रति लिटर आहे. या दोन्ही गाड्यांचा रफ-अँड-टफ लूक आणि मजबूत बिल्ड प्रवासात सेफ्टी आणि चांगला अनुभव देतो. त्यामुळे बजेटमध्ये राहून मजबूत आणि सुरक्षित गाडी हवी असणाऱ्यांसाठी हे दोन्ही पर्याय फायद्याचे ठरतात.