ट्रम्प आणि नेतन्याहू सत्तेत असेपर्यंत होर्मूझ खाडी बंदच राहणार, इराणचा दावा
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धाला २०० दिवसांहून अधिक काळ लोटला असून, दोन्ही नेते सत्तेत असेपर्यंत होर्मूझ खाडी बंदच राहील असे इराणकडून सांगितले जात आहे.
तीन दिवसांत इराणमधलं सत्तेवरचं सरकार उलथवून आपल्याला हवं ते सरकार आणू शकतो, असं सांगत ट्रम्प यांनी म्हणजेच अमेरिकेने इराणविरुद्ध युद्ध छेडलं होतं. हे तीन दिवसांचं युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ ला सुरू झालं आणि आजही, म्हणजे १८ सप्टेंबर २०२६ लाही सुरूच आहे. आतापर्यंत तब्बल २०२ दिवस पूर्ण झाले असून आज युद्धाचा २०३ वा दिवस सुरू आहे. एवढं होऊनही इराण अजून शरण गेलेला नाही किंवा पराभूतही झालेला नाही.
या युद्धाची किंमत इस्रायल आणि अमेरिकेला जेवढी मोजावी लागतेय, त्यापेक्षा जास्त किंमत इराण मोजतोय. कारण गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून अमेरिकेने आपल्या ताकदीचा वापर करत इराणवर आर्थिक नाकेबंदी लादलेली आहे. परदेशी बँकांमधली इराणची गुंतवणूक आणि मालमत्तांवरही बंदी घातलेली आहे. या आधीच्या आर्थिक टंचाईला इराण तोंड देत असतानाच नेतन्याहू आणि ट्रम्प यांनी पहिला हल्ला करून हे युद्ध एकप्रकारे इराणवर लादलं. त्यामुळे इराणवरचा आर्थिक ताण आणखी वाढला, इराणच्या चलनाची किंमत आणखी घसरली आणि महागाई वाढली.
नेतन्याहू आणि ट्रम्प इथेच थांबले नाहीत. या युद्धात इस्रायल आणि अमेरिकेने युद्धाचे अनेक नियम मोडल्याचं सांगितलं जातंय. इराणमधले मोठमोठे शास्त्रज्ञ, सरकारी अधिकारी आणि इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांना टार्गेट करून त्यांचा खून करण्यात आला. एवढं करूनही दोघे थांबले नाहीत आणि एका शाळेवर मिसाईल हल्ला करून एका क्षणात तब्बल १२० लहान मुलांचा जीव घेतला. या सगळ्या कृत्यांमुळे इराणला नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्याबद्दल विशेष राग असल्याचं बोललं जातंय.
होर्मूझ खाडीला एवढं महत्त्व का, याचं कारण म्हणजे जगातल्या एकूण तेल वाहतुकीपैकी जवळपास २० टक्के सागरी वाहतूक फक्त याच मार्गावरून होते. होर्मूझच्या भौगोलिक रचनेत एका बाजूला ओमान तर दुसऱ्या बाजूला इराण हे देश येतात, आणि या दोन्ही देशांच्या जमिनीवरून सहज हल्ला करून हा मार्ग बंद पाडता येतो. आखाती देशांचा तेल व्यवसाय याच मार्गावर बऱ्यापैकी अवलंबून असल्याने होर्मूझला महत्त्व आहे. अमेरिका होर्मूझवर आपलं पूर्ण नियंत्रण असल्याचा कितीही दावा करत असली, तरी प्रत्यक्षात या मार्गातून फक्त इराण आणि चीन यांच्यातला व्यापार व्यवस्थित सुरू असल्याचं दिसून आलंय. कारण चीनशी थेट लढाई करणं आता अमेरिकेला शक्य नाही, चीन आता पूर्वीचा राहिलेला नाही. त्यामुळे होर्मूझ बंद असला तरी इराण आणि चीनला त्याने फारसा फरक पडत नाही. मात्र बाकीच्या जगाला होर्मूझ लवकर उघडायची गरज आहे, कारण युद्धापूर्वी असलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आता दुप्पट झाल्या आहेत.
युद्ध थांबावं अशी इच्छा तिन्ही देशांची आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर देशांचीही आहे. महागड्या मिसाईलच्या वापरामुळे अमेरिका आणि इस्रायलचं कंबरडं मोडलंय. यापूर्वी पेंटागॉननेही युद्धाच्या खर्चाबाबत विधान केलं होतं आणि अमेरिकेत इराणविरुद्धचं हे युद्ध आपलं युद्ध नाही, अशी भावना तीव्र होत चाललीय. पण मध्यावधी निवडणुकीआधी युद्ध थांबवलं, तर युद्धात नेमकं काय मिळवलं याचं उत्तर ट्रम्प यांना द्यावं लागेल. अमेरिका पुन्हा युद्धात हरली अशी जगभर चर्चा सुरू झाली, तर निवडणुकीत मोठा पराभव होऊन ट्रम्प यांना पायउतार व्हावं लागू शकतं, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळेच ट्रम्प युद्ध थांबवत नसल्याचं बोललं जातंय.
नेतन्याहू यांच्याबाबतही परिस्थिती वेगळी नाही. युद्ध बंद झाल्यास इस्रायलमध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सुरू असलेल्या कोर्ट केसेसना सामोरं जावं लागेल, तर दुसरीकडे इस्रायलमध्ये पंतप्रधानपदाच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे युद्ध सुरू असताना राष्ट्रीय भावनेच्या आडून त्यांना आणखी वेळ मिळतोय आणि हे युद्ध सुरूच राहणं दोघांसाठीही गरजेचं बनलंय, यात सामान्य निष्पाप नागरिकांचा बळी जात असला तरीही.