'दायरा' सिनेमाच्या कथेचे टाइम्स ग्रुपचे एमडी विनीत जैन यांच्याकडून कौतुक
करीना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या 'दायरा' सिनेमाबद्दल पत्रकार परिषदेत विनीत जैन यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया.
करीना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या 'दायरा' या आगामी सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ट्रेलर आल्यापासून प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली असून, आता सगळे थिएटरमध्ये सिनेमा येण्याची वाट बघत आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका मेघना गुलझार यांचा हा सिनेमा 18 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. रिलीजच्या आधी निर्मात्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत टाइम्स ग्रुपचे एमडी विनीत जैन यांनी 'दायरा' सिनेमाबद्दल एक महत्त्वाचे मत मांडले.
विनीत जैन यांनी सांगितले की, सिनेमा हा फक्त मनोरंजनापुरता मर्यादित राहत नाही. एखादी दमदार कथा लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते आणि त्यातून लोकांमध्ये चर्चा घडवून आणू शकते, असं ते म्हणाले. 'दायरा' सिनेमाची कथा अगदी निर्दोष आहे आणि ती खऱ्या आयुष्याशी घट्ट जोडलेली आहे, तसेच अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न ही कथा उभे करते, असंही त्यांनी नमूद केलं.
पत्रकार परिषदेत विनीत जैन म्हणाले, "कथा, विशेषतः सिनेमा, हा लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांच्या विचारसरणीवर प्रभाव पाडण्याचा एक अतिशय शक्तिशाली मार्ग आहे. आमच्यासाठी सिनेमा म्हणजे केवळ मनोरंजन नसून लोक आणि समाजाशी जोडलं जाण्याचं एक मजबूत माध्यम आहे."
'दायरा'ची कथा पहिल्यांदा ऐकल्यावर आपल्याला काय वाटलं, हे सांगताना विनीत जैन म्हणाले, "जेव्हा मी पहिल्यांदा 'दायरा'ची कथा ऐकली, तेव्हा ती मला पूर्णपणे योग्य आणि निर्दोष वाटली. ही कथा खऱ्या आयुष्याशी जोडलेली असून एक सशक्त सिनेमा घडवते. हा सिनेमा अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उभे करतो आणि लोकांना विचार करायला भाग पाडेल. मला पूर्ण खात्री आहे की, लोक थिएटरमधून बाहेर पडतील, तेव्हा हे अस्वस्थ करणारे प्रश्न त्यांच्या मनात कायम घर करून राहतील."
सिनेमा बनवण्यामागचं कारण सांगताना ते पुढे म्हणाले, "या प्रश्नांवर चर्चा होईल, वादविवाद होतील आणि लोक आपली मतं मांडतील. सिनेमा बनवण्यामागे हेदेखील एक मोठं कारण होतं."
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मेघना गुलझार यांचा 'दायरा' हा एक क्राईम थ्रिलर सिनेमा आहे. यात करीना कपूर खान डीसीपी अजुनी कोहली आणि पृथ्वीराज सुकुमारन डीसीपी रमण कुमार या भूमिकेत दिसणार आहेत. दोन पोलीस अधिकाऱ्यांभोवती या सिनेमाची कथा फिरते, ज्यांना न्याय हवा आहे, पण तो मिळवण्याचा दोघांचा मार्ग वेगळा आहे.