हॉकी इंडियात गोंधळ, भगव्या जर्सीच्या वादावरुन DG आर. के. श्रीवास्तव यांचे अधिकार काढले
जर्सीचा रंग बदलल्यावरुन हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी DG आर. के. श्रीवास्तव यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून त्यांच्यावर आठ गंभीर आरोप ठेवले आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
भारतीय हॉकी संघ गेली अनेक वर्षे निळ्या जर्सीत मैदानात उतरत होता. पण हॉकी विश्वचषकादरम्यान अचानक जर्सीचा रंग भगवा करण्यात आला आणि त्यावरुन मोठा वाद पेटला. आता या वादाला नवं वळण मिळालं आहे. हॉकी इंडियाने आपले डायरेक्टर जनरल कमांडर (DG) आर. के. श्रीवास्तव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांचे सगळे अधिकार तात्काळ प्रभावाने रद्द केले आहेत.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी स्वतः ही नोटीस पाठवली असून त्यात श्रीवास्तव यांच्यावर एकूण आठ गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत उत्तर आलं नाही, तर उपलब्ध नोंदींच्या आधारे पुढची कायदेशीर आणि शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असं नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
श्रीवास्तव यांच्यावरच्या मुख्य आरोपांपैकी एक म्हणजे भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा रंग बदलणं. पारंपरिक निळी जर्सी बदलून भगवी जर्सी आणण्याआधी अध्यक्ष किंवा कार्यकारी समितीशी कुठलीही चर्चा झाली नव्हती, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. वारंवार विचारणा करूनही या निर्णयासंबंधीची कुठलीही अधिकृत कागदपत्रं किंवा मंजुरी दाखवण्यात आली नाही, असाही आरोप आहे.
हॉकी इंडियाने जुनी निळी जर्सी बाजूला ठेवून भगव्या रंगाची जर्सी वापरायला सुरुवात केली आणि भारतीय संघाने नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये झालेल्या एफआयएच विश्वचषक स्पर्धेत याच भगव्या किटमध्ये सामने खेळले. निळ्या मैदानावर निळ्या जर्सीतले खेळाडू ओळखायला अडचण येते, हे या बदलामागचं कारण सांगण्यात आलं होतं. पण या निर्णयावरुन हॉकी विश्वात मोठा गोंधळ उडाला आणि अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी उघडपणे या निर्णयाला विरोध दर्शवला.
कमांडर आर. के. श्रीवास्तव यांना भारताबाहेर प्रवास न करण्याचे आदेश देण्यात आले होते. भारतातच थांबून हॉकी इंडिया लीगच्या (HIL) तयारीवर आणि इतर कामांवर लक्ष द्यावं, अशा स्पष्ट सूचना त्यांना दिल्या गेल्या होत्या. तरीही या सूचनांकडे दुर्लक्ष करत ते विश्वचषकासाठी नेदरलँड्स आणि बेल्जियमला गेले, असा आरोप आहे.
याशिवाय त्यांच्यावर आणखी काही आरोप आहेत. एका पीआर एजन्सीवर बंदी घालणं, खेळाडूंना वाईट वागणूक देणं, मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांच्याशी संबंधित वाद आणि FIH व AHF सारख्या बाहेरच्या संस्थांशी परस्पर अनधिकृत चर्चा करणं, अशा गोष्टींचाही या आठ आरोपांमध्ये समावेश आहे.