जाहिरातीतील विश्वासार्हतेसाठी ASCI चा व्हिजन 2032 आराखडा, तीन नवी उत्कृष्टता केंद्रे उभारणार
अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाने ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हिजन २०३२ जाहीर केला असून, एआय युगात जाहिरातींची विश्वासार्हता टिकवण्यासाठी कायदा, एआय आणि क्रिएटर्ससाठी स्वतंत्र केंद्रे उभारण्याचे नियोजन आहे.
अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच ASCI ने आपल्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) व्हिजन २०३२ हा आराखडा जाहीर केला आहे. यात २०२७ ते २०३२ या पाच वर्षांच्या काळात भारतातील जाहिरात परिसंस्थेत विश्वासार्हतेची भक्कम पायाभूत सुविधा उभी करण्यावर भर देण्यात आला आहे.
जाहिरात क्षेत्रात आज आढावा घेण्यासाठी असणारा वेळ सतत कमी होतोय, देखरेख ठेवण्याची माध्यमे बदलतायत आणि क्रिएटर्समुळे नियंत्रण यंत्रणाही बदलतेय. हे सगळे बदल पारंपरिक सुरक्षा उपायांपेक्षा जास्त वेगाने घडतायत. त्यामुळे विश्वासार्हता जपणे, ती स्पष्टपणे सांगणे आणि मोठ्या प्रमाणावर टिकवून ठेवणे हेच आता कळीचे काम बनले आहे. काही वेळा अपप्रवृत्ती मूळ संवादावर ताबा मिळवतात, तर दुसरीकडे ग्राहक पुरावे आणि ठोस स्पष्टीकरणे मागतायत. त्यातच जाहिराती आता सार्वजनिक आरोग्य, ऑनलाइन सुरक्षितता आणि लहान मुलांच्या स्वास्थ्यासारख्या मोठ्या सामाजिक चर्चांमध्येही ओढल्या जातायत.
व्हिजन २०३२ मध्ये असे मान्य करण्यात आले आहे की जाहिरात क्षेत्र सध्या मोठ्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयसारखे क्रांतिकारी बदल, तसेच व्यक्तीनुरूप संवाद, रिटेल मीडिया आणि नव्या डिजिटल स्वरूपांसारखे प्रमुख बदल या क्षेत्रात होतायत. पारंपरिक स्वनियमन हे ASCI च्या कामाचा गाभा राहिले असले, तरी संस्था आता धोरण, संशोधन, शिक्षण, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षमता बांधणीच्या माध्यमातून आपली भूमिका आणखी विस्तारण्याचा विचार करतेय.
या आराखड्याअंतर्गत ASCI तीन उत्कृष्टता केंद्रे म्हणजे सेंटर्स ऑफ एक्सलन्स उभारणार आहे. पहिले, ASCI लीगल अँड पॉलिसी फोरम - यात उद्योगक्षेत्र, कायदेतज्ज्ञ, नियामक, शिक्षणतज्ज्ञ आणि ग्राहकांचे प्रतिनिधी एकत्र येऊन नियामक स्पष्टता, अर्थ स्पष्टीकरण किंवा धोरण विकासाची गरज असलेल्या नव्या मुद्द्यांवर चर्चा करतील. हे फोरम संशोधन, धोरणात्मक चर्चा, मार्गदर्शन आणि उद्योग प्रशिक्षणालाही पाठबळ देईल.
दुसरे केंद्र म्हणजे ASCI सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल इनोव्हेशन इन एआय इन अॅडव्हर्टायझिंग. हे सर्जनशील विकास, लक्ष्यीकरण, व्यक्तीनुरूपता, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग आणि ग्राहक सहभाग अशा सर्व क्षेत्रांत एआयचा जबाबदार वापर व्हावा यासाठी काम करेल. सिंथेटिक मीडिया, एआय-निर्मित दावे, स्वायत्त निर्णय प्रक्रिया आणि ग्राहकांच्या माहितीपूर्ण निवडीवर परिणाम करणाऱ्या इतर उदयोन्मुख क्षेत्रांवर हे केंद्र मार्गदर्शन आणि संशोधन विकसित करेल.
तिसरे केंद्र म्हणजे ASCI सेंटर फॉर क्रिएटर एक्सलन्स अँड ट्रस्ट. हे वेगाने वाढणाऱ्या क्रिएटर परिसंस्थेशी जोडले जाऊन व्यावसायिक मानक व प्रशिक्षण, क्रिएटर प्रमाणीकरण, प्रकटीकरण आणि नियमपालन तसेच संशोधनावर लक्ष केंद्रित करेल.
या महत्त्वाच्या उपक्रमांना दिशा देण्यासाठी संचालक मंडळाने विद्यमान अध्यक्ष सुधांशू वत्स यांची अतिरिक्त कार्यकाळासाठी फेरनिवड केली आहे. एस सुब्रमण्येश्वर उपाध्यक्षपदी, तर परितोष जोशी मानद खजिनदार म्हणून कायम राहतील.
या प्रसंगी बोलताना ASCI चे अध्यक्ष सुधांशू वत्स म्हणाले, भारतातील जाहिरात क्षेत्र ज्या गतीने विकसित होतेय, ते पाहता समोर मोठी नियामक आव्हाने आहेत. एआय, क्रिएटर्स, विविध प्लॅटफॉर्म्स आणि व्यक्तीनुरूपता या सगळ्या गोष्टी ब्रँड्स प्रेक्षकांपर्यंत कसे पोहोचतात या पद्धतीला नवा आकार देतायत. ASCI चे व्हिजन २०३२ प्रत्यक्षात साकार व्हावे यावर आपला मुख्य भर असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही महिन्यांत उभारली जाणारी तीन उत्कृष्टता केंद्रे ही ASCI च्या प्रवासातील महत्त्वाचे पाऊल असल्याचेही ते म्हणाले. ASCI नियमन करत असलेल्या परिसंस्थेच्या गतीने संस्थेच्या क्षमताही वाढाव्यात यावर संचालक मंडळाचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
ASCI चे उपाध्यक्ष एस. सुब्रमण्येश्वर यांनी सांगितले की, आजच्या जाहिरात क्षेत्रात पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त घटक सहभागी झाले आहेत आणि व्हिजन २०३२ या सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची खात्री देतो. उभारल्या जाणाऱ्या उत्कृष्टता केंद्रांमुळे जाहिरात परिसंस्थेतील पारंपरिक घटकांपलीकडे जाऊन अनेक भागधारकांना अधिक व्यापक सहभाग मिळेल, अशी गरजही त्यांनी अधोरेखित केली. यामुळे विस्तारत जाणारी जाहिरात परिसंस्था स्वनियमनाच्या पद्धतींशी प्रभावीपणे जोडली जाईल, असे त्यांनी सांगितले.
ASCI अकॅडमी प्रशिक्षण, ग्राहक शिक्षण आणि वैचारिक नेतृत्वावर भर देणे सुरूच ठेवणार आहे. यात पुढील उपक्रम म्हणून ट्रस्ट इन अॅडव्हर्टायझिंग इंडेक्स, उद्योग आणि विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण उपक्रम, संशोधन भागीदारी, ग्राहक शिक्षण उपक्रम आणि ASCI अॅडट्रस्ट आयपी यांचा समावेश असेल.
ASCI ची सध्याची तक्रार निवारण यंत्रणा ग्राहकांच्या तक्रारींची तपासणी सुरूच ठेवणार आहे, तसेच प्राधान्य श्रेणी, जाहिरातींचे नवे प्रवाह आणि त्रुटींवर स्वतःहून देखरेख ठेवणाऱ्या विभागाला अधिक बळकट करणार आहे. आपली देखरेख क्षमता वाढवण्यासाठी ASCI चा तक्रार विभाग विविध एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे पर्यायही तपासून पाहतोय.
व्हिजन २०३२ च्या माध्यमातून जाहिरातींवरील विश्वासार्हता हा आपल्या दीर्घकालीन अजेंड्याचा केंद्रबिंदू ठेवून, स्वनियमनाचा अधिकार वाढवणे आणि धोरण, संशोधन, शिक्षण, तंत्रज्ञान व परिसंस्थेतील सहभागातील आपली भूमिका अधिक भक्कम करणे, हे ASCI चे उद्दिष्ट आहे.