अनिल कपूर म्हणाला, दोन मुली असणं म्हणजे दुप्पट नशीब
अनिल कपूरच्या नव्या शोच्या शूटिंगमध्ये एका स्पर्धकाच्या बोलण्यावरून तो भावूक झाला आणि त्याने रियाच्या जन्माची जुनी आठवण सांगितली.
बॉलिवूडचा हिरो अनिल कपूर आता 69 वर्षांचा झाला आहे, पण त्याची एनर्जी अजूनही तरुणांना लाजवेल अशीच आहे. कामावरचं त्याचं प्रेम आजही तसंच टिकून आहे. आता तो एक नवा शो घेऊन येतोय, त्याचं नाव आहे 'इंडिया के टॉप 1%: द अनिल कपूर शो'. हा शो 19 सप्टेंबरपासून रात्री 8 वाजता Star Plus आणि JioHotstar वर बघायला मिळणार आहे. या शोमध्ये फक्त खेळ नाही, तर खूप इमोशनल क्षणही बघायला मिळणार आहेत.
शोच्या शूटिंगदरम्यान एक किस्सा घडला, ज्यामुळे अनिल कपूर भावूक झाला. एका स्पर्धकाने सांगितलं की त्याने आपल्या कुटुंबासाठी कामातून ब्रेक घेतला आहे, कारण कुटुंबाला वेळ देणं त्याला जास्त गरजेचं वाटलं. हे ऐकून अनिल कपूरला त्याच्या जुन्या दिवसांची आठवण झाली आणि तो खूप भावूक झाला.
त्यानंतर त्याने आपल्या आयुष्यातला सगळ्यात कठीण क्षण सगळ्यांसमोर मांडला. अनिल म्हणाला, "खूप लोकांना वाटतं की मी माझ्या कुटुंबासाठी काम करतो. पण खरं तर कुटुंबाला वेळ देणं किती महत्त्वाचं आहे, हे मी आता शिकतोय. माझे जावई बघा, ते काम आणि कुटुंब दोन्हीला वेळ देतात. पण मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो, तेव्हा मला हे जमलं नाही."
पुढे अनिलने एक गोष्ट सांगितली, जी ऐकून सगळे शांत झाले. तो म्हणाला, "जेव्हा माझी दुसरी मुलगी रिया जन्माला येणार होती, तेव्हा मी शूटिंगमध्ये अडकलो होतो. मी रात्रभर शूट करत होतो आणि मला झोप लागली. मी उठलो तेव्हा रिया जन्माला आलेली होती. मी हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचू शकलो नाही, उशिरा पोहोचलो. या गोष्टीसाठी मी आजपर्यंत स्वतःला माफ करू शकलो नाही."
तो पुढे म्हणाला, "मुलगी होणं म्हणजे नशीबच आहे, एक बोनस आहे. आणि माझ्याकडे तर दोन मुली आहेत, सोनम आणि रिया. म्हणजे माझ्यासाठी हा दुप्पट बोनस आहे." अनिलच्या या बोलण्याने तिथे असलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
हा शो फक्त स्टेजवरच्या 100 लोकांपुरता मर्यादित नाहीये. प्रेक्षकांना घरबसल्या यात सहभागी होता येणार आहे. JioHotstar वर Play Along हा पर्याय असणार आहे, ज्याद्वारे घरी बसून प्रश्नांची उत्तरं देता येतील आणि स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोनसारखी बक्षिसं जिंकता येतील. यातून प्रेक्षकांच्या हुशारीची आणि डोक्याची परीक्षा होणार असून, आपण खरंच इंडियाच्या टॉप 1% मध्ये येतो का, हे कळणार आहे. त्यामुळे 19 सप्टेंबर रात्री 8 वाजता Star Plus आणि JioHotstar वर अनिल कपूरचा हा शो बघायला विसरू नका.