नागपुरात रिश्ता तुटल्याने संतापून तरुणाचा माजी प्रेयसीच्या घरी हंगामा
नागपुरातील पारडी पोलीस स्टेशन हद्दीत एका तरुणाने आपल्या माजी प्रेयसीच्या घरी जाऊन हंगामा घातल्याची घटना घडली आहे. दोघांमधील प्रेमसंबंध तुटल्याने संतापलेल्या आरोपी तरुणाने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.
३१ वर्षीय पीडित तरुणी तीन वर्षांपूर्वी भंडारा येथे राहत होती. त्याचवेळी तिची अक्षय कांबळे या समवयस्क तरुणाशी ओळख झाली होती. अक्षय हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे सांगितले जाते. या ओळखीचे पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंधात रूपांतर झाले. काही काळानंतर नोकरीच्या शोधात पीडित तरुणी नागपुरात येऊन राहू लागली.
नागपुरात आल्यानंतर अक्षय तिच्यावर संशय घेऊ लागला. तो तिला शिवीगाळ करू लागला आणि मारहाणही करू लागला. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने अक्षयसोबतचे संबंध तोडून टाकले. मात्र संबंध तुटल्यानंतरही अक्षय तिचा पिच्छा सोडत नव्हता. गेल्या काही दिवसांपासून तो सातत्याने तिचा पाठलाग करत होता.
१६ सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास अक्षय पीडित तरुणीच्या घरी पोहोचला आणि तिच्या घराचा दरवाजा जोरजोरात ठोकू लागला. या प्रकाराने घाबरलेल्या पीडित तरुणीने त्यानंतर पारडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी अक्षय कांबळे याला अटक केली आहे.