शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:43 IST

पुरंदर: सोनोरी मॉडेल स्कूलच्या बांधकामात लाखोंच्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप

सोनोरीतील जिल्हा परिषद शाळेला मॉडेल स्कूल योजनेतून एक कोटी रुपयांचा निधी मिळाला, पण जुन्याच इमारतीवर दोन खोल्या बांधून लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

पुरंदर: सोनोरी मॉडेल स्कूलच्या बांधकामात लाखोंच्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची शासनाच्या मॉडेल स्कूल उपक्रमात निवड झाली होती. या निवडीनंतर शाळेच्या बांधकामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र ठेकेदाराने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून जुन्याच शाळा इमारतीवर फक्त दोन वर्गखोल्यांचे बांधकाम केले आणि त्या बदल्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोनोरीतील ग्रामस्थांनी केला आहे.

मॉडेल स्कूल उपक्रमांतर्गत शाळेला भौतिक सुविधा देतानाच शाळा दर्जेदार दिसावी यासाठी नव्याने बांधकाम केले जात आहे. यात दोन वर्गखोल्या मंजूर झाल्या असून शाळा परिसराचाही विकास केला जात आहे. वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी ४८ लाख ३६ हजार ९८८ रुपये तर शाळा दुरुस्तीसाठी ३० लाख ५१ हजार २९१ रुपयांचा निधी मंजूर झाला.

जिल्हा परिषदेने सुधीर कातोरे या ठेकेदारास हे काम दिले होते. कातोरे यांनी हेच बांधकाम सोनोरीतील स्थानिक ठेकेदार नितीन काळे यांना पोट-ठेका म्हणून दिले, अशी माहिती पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उप अभियंता संतोष नलावडे यांनी दिली.

सोनोरीत दोन वर्षांपूर्वीच विविध कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून शाळेला दर्जेदार संपूर्ण इमारत बांधून दिली होती. यात संरक्षण भिंत, रंगरंगोटी आणि स्वतंत्र स्वच्छतागृहही बांधून देण्यात आले होते, त्यामुळे शाळेची गरज आधीच पूर्ण झाली होती. मात्र ठेकेदार नितीन काळे यांनी पंचायत समितीतील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून तीन ते चार वर्षांपूर्वी बांधलेल्या याच शाळा इमारतीच्या वरच्या मजल्यावर दोन खोल्यांचे बांधकाम केले आणि त्या दोन खोल्यांच्या बदल्यात तब्बल ४८ लाखांच्या निधीचा भ्रष्टाचार केल्याचा सनसनाटी आरोप आरपीआय (आठवले) पुरंदर तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी केला आहे.

प्रत्यक्षात तीन-चार वर्षांपूर्वीच शाळेचे बांधकाम झाले असून त्यात फरशी, वॉटरप्रूफिंग, रंगकाम, खिडक्या, दरवाजे आणि स्टेज अशी सगळी कामे आधीच झाली होती. त्यावर आता जिना, लोखंडी ग्रील, संरक्षण भिंतीवर स्टीलचे रेलिंग आणि स्टेजवर पत्रा अशा किरकोळ कामांसाठी तब्बल ३० लाख ५१ हजार २९१ रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे. दोन्ही वर्गखोल्या आणि इतर सगळी कामे मिळून जास्तीत जास्त १५ ते २० लाख रुपये पुरेसे होते, मात्र तब्बल ८० लाखांचा निधी खर्च झाल्याचे दाखवले गेले असून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे बळीराम सोनवणे यांनी सांगितले.

शाळेच्या बांधकामासाठी एकूण एक कोटी २ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी जवळपास ३० टक्के म्हणजे २० लाख रुपये विविध करांमध्ये कापले गेले. प्रत्यक्षात ७८ ते ८० लाखांचे काम झाल्याचे दाखवले गेले आहे. आतापर्यंत ठेकेदाराला २२ लाख रुपये देण्यात आले असून अद्याप पूर्णत्वाचा दाखला देण्यात आलेला नाही. काम पूर्ण झाल्यानंतर उरलेले पैसे प्रत्यक्ष काम पाहून दिले जातील, असे पुरंदर पंचायत समितीचे बांधकाम उप अभियंता संतोष नलावडे यांनी सांगितले.

याबाबत बोलताना बळीराम सोनवणे म्हणाले की, प्रत्यक्षात झालेले काम फक्त १५ ते २० लाखांचे असून उरलेल्या पैशांचा भ्रष्टाचार झाला आहे. अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला कामाचे पूर्ण पैसे दिले असून लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठीच पूर्णत्वाचा दाखला दिलेला नसावा, असा त्यांचा आरोप आहे. अधिकारी आणि ठेकेदार पूर्ण माहिती न देता उलट अरेरावीची भाषा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावर कारवाई व्हावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा सोनवणे यांनी दिला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ