'गोंधळ' सिनेमाला ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत एंट्री, 33 चित्रपटांतून निवड
संतोष डावखर दिग्दर्शित मराठी सिनेमा 'गोंधळ' ला फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म कॅटेगरीत भारताची अधिकृत एंट्री म्हणून निवडलं आहे.
मराठी सिनेमासृष्टीसाठी एक भारी बातमी समोर आली आहे. संतोष डावखर यांनी दिग्दर्शित केलेला 'गोंधळ' हा मराठी सिनेमा आता ऑस्करच्या वाटेवर आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI) ने 99 व्या ऑस्कर अवॉर्ड्ससाठी, म्हणजे ऑस्कर 2027 साठी, भारताकडून अधिकृत एंट्री म्हणून 'गोंधळ' ची निवड केल्याची घोषणा केली आहे. बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म या कॅटेगरीत आता हा सिनेमा भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
वेगवेगळ्या भाषांमधील एकूण 33 चित्रपटांमधून FFIच्या निवड समितीने 'गोंधळ' ला पुढे पाठवलं आहे. या 33 चित्रपटांमध्ये 14 हिंदी, 4 मराठी, 4 तेलगू, 4 गुजराती, 3 तमिळ, 1 मल्याळम, 1 नागामी आणि 1 मूक (सायलेंट) चित्रपटाचा समावेश होता. यातून 'गोंधळ' ने बाजी मारली.
'गोंधळ' हा थ्रिलर सिनेमा असला तरी त्याची कथा महाराष्ट्राच्या मातीतली आहे. महाराष्ट्रात लग्नानंतर किंवा वरा-नवरीच्या आयुष्यातलं विघ्न दूर करण्यासाठी गोंधळ घातला जातो, ही परंपरा राज्यातल्या जवळपास 80 टक्के भागात पाळली जाते. याआधी 'कांतारा' सिनेमा कर्नाटकच्या 20 टक्के भागातल्या परंपरेवर बेतलेला होता, तर 'दशावतार' कोकणात प्रसिद्ध आहे. मात्र 'गोंधळ' ही परंपरा अख्ख्या महाराष्ट्रात साजरी होते, आणि हीच या सिनेमाची सगळ्यात मोठी ताकद मानली जाते आहे.
हा सिनेमा फक्त एका धार्मिक विधीभोवती फिरत नाही. यात अंधश्रद्धा, घरातली भांडणं, नात्यांमधले प्रॉब्लेम, बदलती सामाजिक विचारसरणी आणि माणसाच्या मनातला गोंधळ हे सगळं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे हा सिनेमा फक्त मराठी प्रेक्षकांनाच नाही तर जगभरातल्या प्रेक्षकांनाही कनेक्ट होईल असा आहे. कॅमेरा वर्क, बॅकग्राऊंड म्युझिक आणि तांत्रिक बाजू टॉप लेव्हलच्या असल्यामुळे मराठी संस्कृती जगासमोर ताकदीने मांडली गेली आहे.
दरवर्षी FFI जगभरातल्या ऑस्करसाठी एका भारतीय सिनेमाची निवड करतं. यंदा अनेक हिंदी, तमिळ, मल्याळम सिनेमे स्पर्धेत होते, पण त्यातून 'गोंधळ' पुढे गेला. सिनेमाचा मूळ, आपल्या मातीतला आणि आपल्या संस्कृतीतला विषय हे यामागचं कारण मानलं जातं आहे. 'गोंधळ' कुठल्याही सिनेमाची कॉपी नसून त्यात मूळ ओरिजिनॅलिटी आहे.
या सिनेमात मराठीतले दिग्गज कलाकार आहेत. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळिंबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि प्रशांत देशपांडे यांच्या मुख्य भूमिका यात आहेत. यातील किशोर कदम यांचा अभिनय नेहमीप्रमाणे दमदार असल्याचं म्हटलं जातं आहे.
याआधीही मराठी सिनेमांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत, पण थेट ऑस्करला अधिकृत एंट्री म्हणून जाणं ही वेगळी आणि मोठी गोष्ट आहे. यामुळे मराठी सिनेमा जागतिक पातळीवर पोहोचेल. पुढच्या टप्प्यात ऑस्करच्या ज्युरींसमोर हा सिनेमा दाखवला जाईल. जगभरातल्या देशांमधून आलेल्या चित्रपटांमधून आधी बेस्ट 15 आणि नंतर बेस्ट 5 चित्रपट निवडले जातील. 'गोंधळ' तिथपर्यंत पोहोचला तरी तो मोठा विजय मानला जाईल. सोशल मीडियावरही 'गोंधळ' सध्या ट्रेंड करत असून संतोष डावखर आणि त्यांच्या टीमचं सगळीकडून कौतुक होत आहे. अंतिम ऑस्कर नामांकनासाठी पुढची निवड प्रक्रिया अजून बाकी आहे.