नागपुरात तरुणाचे अपहरण करून मारहाण, बाईकच्या कटवरून वाद
नागपुरातील कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील भिलगाव भागात बाईकचा कट मारल्याचा आरोप ठेवत आरोपींनी तरुणाचे अपहरण करून मारहाण केली.
नागपुरातील कळमना पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भिलगाव भागात एक घटना घडली आहे. या भागात बाईकचा कट मारल्याचा आरोप ठेवत काही आरोपींनी एका तरुणाचे अपहरण केले आणि त्याला जखमी केले. जखमी झालेल्या तरुणाचे नाव शेख नौशाद शेख नसूल असे आहे.
गुरुवारी रात्री नौशाद आपल्या दोन मित्रांसोबत घरी जात होता. त्याचवेळी दोन बाईकवरून चार तरुण तिथून गेले. या दोन्ही बाईकचा एकमेकांना कट लागला, याच कारणावरून त्या चार तरुणांनी नौशादशी वाद घालायला सुरुवात केली. समोरून आलेल्या आरोपींचा अवतार आणि आक्रमक पवित्रा पाहून नौशाद तिथून पुढे निघून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र आरोपींनी त्याला वाटेतच अडवून धरले आणि जाऊ दिले नाही.
यानंतर आरोपींनी चाकू काढून तो नौशादला दाखवला, त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आणि त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. हा सगळा प्रकार समोर घडताना पाहून नौशादसोबत असलेले त्याचे मित्र घाबरून तिथून पळून गेले. त्यानंतर आरोपींनी नौशादला जबरदस्तीने बाईकवर बसवले आणि त्याला तिथून घेऊन गेले.
या सगळ्या प्रकारानंतर नौशादने पोलिसांना याबाबत माहिती दिली. कळमना पोलिसांनी अपहरण आणि हल्ल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी कलश सुमेश उर्फ बंडू नंदेश्वर आणि मोहम्मद अखिल उर्फ बल्लम अंसारी या दोन आरोपींना अटक केली.
या प्रकरणातील त्यांचे साथीदार रजा उर्फ माजीद अंसारी आणि मैसर जमाल सागिर हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी पेशाने गुन्हेगार आहेत.