धाराशिवमधील मुक्तिसंग्राम हुतात्म्यांचा स्मृतिस्तंभ दुर्लक्षित, कार्यकर्त्यांकडून नाराजी
धाराशिव शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील स्मृतिस्तंभावर मराठवाडा मुक्तिसंग्रामातील १७ हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत, पण स्वच्छता आणि देखभालीअभावी त्याची दुरवस्था झाल्याची तक्रार आहे.
निजामाच्या राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले, त्यांच्याच स्मृतींची धाराशिव शहरात उपेक्षा होत असल्याचे समोर आले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील १७ हुतात्म्यांची नावे आणि भारतीय संविधानाची उद्देशिका कोरलेला शिलालेख असलेला स्मृतिस्तंभ सध्या अडगळीत पडला असून त्याची साधी स्वच्छताही होत नसल्याची तक्रार आहे. मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शासन-प्रशासनाच्या प्रतिनिधींनी या स्मृतिस्तंभाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हा स्मृतिस्तंभ धाराशिव शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात आहे. धाराशिव (तत्कालीन उस्मानाबाद) यांच्यासह मेडसिंगा, चिलवडी, काजळा, सारोळा आणि उतमीकायापूर या भागांतील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती या स्तंभाशी जोडलेल्या आहेत. स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाने कार्यक्रम, भाषणे आणि अभिवादनाचे सोपस्कार होत असताना त्यांच्या स्मृती जपणाऱ्या या स्तंभाची अवस्था मात्र दुर्लक्षित असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
या स्मृतिस्तंभावर मुक्तिसंग्रामात प्राण गमावलेल्या विश्वनाथ एकनाथ भिसे (मेडसिंगा), नरसू कदम, पार्वतीबाई गणपती माळी, विश्वनाथ पांडुरंग लोकरे (चिलवडी), दत्तू तात्याबा मडके, आब्बास तांबोळी, साधू किसन मांग, शंकर माऊली मसे (काजळा), सीताराम कासार (सारोळा), रेवनसिद्धप्पा महादप्पा साखरे, किसन वामनराव चौधरी, रामकृष्ण नरहरी बियाज, शिवाजी सिद्धराम कटके, श्रीकृष्ण नारायण आयचीत (उस्मानाबाद), नागनाथ कृष्णाजी कुंभार आणि चंदूलाल माणिकचंद गांधी (उतमीकायापूर) या १७ स्वातंत्र्यसैनिकांची नावे कोरलेली आहेत.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या कार्यक्रमांवर शासनाकडून मोठा खर्च होत असताना, मुक्तीसाठी प्राण गमावलेल्या याच स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतिस्तंभाची साधी स्वच्छता आणि देखभालही केली जात नसल्याबद्दल नागरिकांमधून प्रश्न विचारले जात आहेत. हुतात्म्यांना अभिवादन करण्यापेक्षा त्यांच्या स्मृती जपणे अधिक महत्त्वाचे नाही का, असा सवाल केला जात आहे.
दरम्यान, मतदार जनजागरण समितीच्या वतीने या स्मृतिस्तंभास अभिवादन करण्यात आले. नायब तहसीलदार महादेव शिंदे आणि नगरसेवक नाना घाटगे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. बलभीम कांबळे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन केले. हा कार्यक्रम स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आयोजित केला होता. स्मृतिस्तंभाची देखभाल आणि स्वच्छता करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची असताना, त्यासाठी कार्यकर्त्यांनाच पुढाकार घ्यावा लागत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते तथा मतदार जनजागरण समितीचे कार्याध्यक्ष गणेश वाघमारे यांनी स्मृतिस्तंभाच्या इतिहासाकडे लक्ष वेधले. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा स्तंभ पूर्वी जुन्या चमन बागेतील सध्याच्या जिजामाता उद्यानात होता. त्यानंतर संत गाडगेबाबा चौकातील हुतात्मा स्मारकाजवळ तो ठेवण्यात आला आणि तेथूनही हलवल्यानंतर सध्या तो छत्रपती संभाजी महाराज उद्यानात आहे. वारंवार जागा बदलणाऱ्या या स्मृतिस्तंभाच्या संवर्धनाची आणि देखभालीची ठोस व्यवस्था अद्याप झालेली नसल्याची खंत वाघमारे यांनी व्यक्त केली.
१७ हुतात्म्यांची नावे आणि भारतीय संविधानाची उद्देशिका असलेला हा शिलालेख स्मृतिस्तंभ मराठवाड्याच्या इतिहासातील महत्त्वाची नोंद असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे स्मृतिस्तंभ सुरक्षित व सन्मानजनक ठिकाणी ठेवून परिसर विकसित करावा, तसेच त्याची नियमित स्वच्छता व देखभाल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हुतात्म्यांचे स्मरण केवळ एका दिवसापुरते आणि पुष्पचक्रापुरते मर्यादित ठेवायचे की त्यांच्या स्मृतींचे कायमस्वरूपी जतन करायचे, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. काजळा येथील स्वातंत्र्यसैनिक किसन राघु मांग (शिंदे) यांचे वारस मोहन शिंदे आणि सहकारी दरवर्षी येथे अभिवादन कार्यक्रम घेतात. स्मृतिस्तंभाच्या जतनासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.