बुलढाण्यात आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालय सुरू होणार, केंद्रीय मंत्री जाधव यांची घोषणा
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवासंकल्प अभियानांतर्गत बुलढाण्यात ५० खाटांच्या आयूष रुग्णालयाचे भूमिपूजनही झाले.
आयुर्वेद शिक्षण, संशोधन आणि औषधांच्या गुणवत्तापूर्ण तपासणीला चालना देण्यासाठी देशात आयुष मंत्रालयाकडून आयुर्वेद गुरुकुलम् महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेच्या आठ परिघीय संस्थांमध्ये औषध परीक्षण प्रयोगशाळा (डीटीएल) सुविधाही विकसित केली जाणार आहे. केंद्रीय आयुष तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी गुरुवारी बुलढाण्यात ही घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 'शाश्वत विकासाची अविरत २५ वर्षे सेवासंकल्प अभियान' अंतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात जाधव बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्ष पूजा गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, जिल्हा परिषदेचे सीईओ गुलाब खरात, राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रेय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी रणजित मंडाले आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील उपस्थित होते.
नागरिकांचे आरोग्य निरोगी आणि सक्षम राहावे यासाठी आधुनिक वैद्यकीय उपचारांसोबतच आयुर्वेद, योग आणि पारंपरिक उपचार पद्धतींचा मेळ घालून एकात्मिक आरोग्य सेवा देण्यावर केंद्र आणि राज्य सरकारचा भर असल्याचे जाधव म्हणाले. आजारांचे वेळीच निदान झाले तर उपचार अधिक परिणामकारक ठरतात, त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला विशेष महत्त्व दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. आयुर्वेद आणि योगाला जागतिक पातळीवर मान्यता मिळत असून अनेक देशांकडून याबाबत माहिती आणि प्रशिक्षणाची मागणी होत असल्याचेही ते म्हणाले. याच उद्देशाने देशभरात आयुष्मान आरोग्य मंदिरे तसेच आयुष विभागाच्या विविध सेवा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या धर्तीवर देशाच्या विविध भागांत आयुर्वेद शिक्षण व संशोधनाच्या सुविधा उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन आणि २३ सप्टेंबर हा आयुर्वेद दिन म्हणून साजरा केला जातो, असेही जाधव यांनी सांगितले. बुलढाण्यातील राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्यातील नागरिकांना अधिक सक्षम आरोग्य सुविधा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या महाविद्यालयात दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळते, तर कृषी महाविद्यालयात ६० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय आहे. बी.एससी. नर्सिंग आणि इतर आधुनिक पदवी अभ्यासक्रमांमुळे आरोग्य शिक्षण क्षेत्राला गती मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग आणि निसर्गोपचार पद्धतींचा एकत्रित लाभ नागरिकांना मिळावा यासाठी आयुर्वेद महाविद्यालयाबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे तसेच जिल्ह्यात बायपास सर्जरी, अँजिओप्लास्टी, क्रिटिकल केअर आणि न्यूरोसर्जरीसह विविध अत्याधुनिक सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही जाधव यांनी सांगितले. आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्यात उपलब्ध होत असलेल्या वैद्यकीय व शैक्षणिक सुविधांची माहिती यावेळी दिली.
सेवासंकल्प अभियानांतर्गत जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात ५० खाटांच्या सुसज्ज आयूष रुग्णालयाचे भूमिपूजन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू नागरिकांना आयूष उपचार पद्धतीद्वारे आरोग्यसेवेचा आणखी एक पर्याय मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयुष मंत्रालयाकडून देशभर सुरू होणारी आयुर्वेद गुरुकुलम् ही निवासी आयुर्वेद संस्था असेल. येथे दोन वर्षांच्या प्री-आयुर्वेद कार्यक्रमासह साडेसात वर्षांचा बीएएमएस पदवी अभ्यासक्रम राबवला जाईल आणि अध्यापनाचे माध्यम संस्कृत असेल.